
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबईकर नेहमीच घाईत असतात, माणुसकी असली तरी ती व्यक्त करायलाही कोणाकडे वेळ नसते. पण दिंडोशी आगारातील बेस्टच्या ड्रायव्हर आणि कंडक्टरने मात्र आपल्या डय़ुटीच्या पलीकडे जाऊन माणुसकीचा एक आदर्श घालून दिला आहे. मध्यरात्री दीड वाजता आरेच्या जंगलात एका महिला प्रवाशाला सोडल्यानंतर रिक्षा मिळेपर्यंत संपूर्ण थांबवून तिला सोबत करण्याची माणुसकी या दोघांनी दाखवली. या महिला प्रवाशाने केलेल्या ट्विटमुळे या दोन कर्मचाऱयांची माणुसकी उजेडात आली आहे.
मुंबईकरांना बेस्ट बसची वाट बघत बसायला वेळ नसतो मग पटकन ते रिक्षा नाहीतर टॅक्सी करतात. पण गोरेगावच्या रॉयल पाम्स येथे राहणाऱया मंताशा शेख हिला मात्र बेस्ट बसने प्रवास करताना सुखद अनुभव आला आहे. शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजता दिंडोशी आगाराची 398 क्रमांकाची महाराणा प्रताप चौक ते आरे कॉलनी या बसमार्गावरील बस साकीनाका येथे आली असता त्यात ही 25 वर्षांची महिला चढली. बसमध्ये ही महिला प्रवासी एकटीच होती. तिला रॉयल पाम्सला जायचे होते. मात्र ही बस आरे मार्केटजवळून जाणारी होती. त्यामुळे तिला तिथे उतरावे लागले. पण तिला पुढची रिक्षा मिळेपर्यंत या बसमधील चालक प्रशांत मयेकर आणि कंडक्टर राज रामुगडे यांनी संपूर्ण बस थांबवून ठेवली. ते दोघेही तिला रिक्षा मिळेपर्यंत थांबून राहिले. दहा मिनिटांनी तिला रिक्षा मिळाल्यानंतर ती बस डेपोत गेली.
आय लव्ह मुंबई
या संपूर्ण घटनेमुळे भारावलेल्या मंताशाने दुसऱया दिवशी ट्विट करून या दोघांचेही आभार मानले. हेच कारण आहे ज्यामुळे मला मुंबई आवडते असेही तिने या ट्विटमध्ये म्हटले आहे. आरेसारख्या गर्द जंगलात मला सोडल्यानंतर त्यांनी मला विचारले, तुला न्यायला कोणी येणार आहे का? मी ‘नाही’ असे उत्तर दिल्यानंतर त्या दोघांनीही माझ्यासाठी बस थांबवून ठेवली, असे तिने ट्विटमध्ये म्हटले आहे.




























































