बेस्टच्या कर्मचाऱ्यांना 5500 सानुग्रह अनुदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
best-2
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी, मुंबई

बेस्ट कर्मचाऱ्यांना खूशखबर आहे. यंदाच्या दिवाळीत कर्मचाऱ्यांना 5500 रुपये सानुग्रह अनुदान मिळू शकणार आहे. बेस्ट समितीने कामगारांच्या बोनसचा प्रश्न लावून धरल्यामुळे आज अखेर महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी सानुग्रह अनुदानाची घोषणा केली. कामगारांच्या पगारातून ही रक्कम कापून घेतली जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यांच्या या निर्णयामुळे सर्वपक्षीय सदस्यांनी टाळय़ा वाजवून आणि पेढे वाटून आनंद साजरा केला. बेस्टच्या कर्मचाऱ्यांना बोनस दिला पाहिजे या मागणीसाठी बेस्ट समिती सदस्यांनी गुरुवारी सभेचे कामकाज रोखून धरले होते.

बिकट आर्थिक परिस्थितीमुळे बोनस देता येणार नाही या मुद्दय़ावर महाव्यवस्थापक ठाम होते, मात्र सर्वपक्षीय सदस्यांनी बोनसचा प्रश्न लावून धरला. कामगारांना बोनस देण्यासाठी पैसे उभे करण्यासाठी सदस्यांनी महाव्यवस्थापकांना विविध मार्ग सुचवले. सुहास सामंत यांनीही आंदोलनाचा इशारा दिला होता. बोनसबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करावे, काहीतरी तोडगा काढावा याकरिता एका दिवसाची मुदत सदस्यांनी महाव्यवस्थापकांना दिली. लागोपाठ दुसऱया दिवशी आज पुन्हा एकदा बोनसचा निर्णय घेण्यासाठी अध्यक्ष आशीष चेंबूरकर यांनी मीटिंग बोलावली होती. मीटिंगच्या सुरुवातीलाच महाव्यवस्थापकांनी साडेपाच हजार रुपये सानुग्रह अनुदानाची घोषणा केली आणि सदस्यांनी बाके वाजवून या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत केले. त्यानंतर सुनील गणाचार्य, सुहास सामंत, अनिल कोकीळ, अनिल पाटणकर, राजेश कुसळे, नाना आंबोले, भूषण पाटील, श्रीकांत कवठणकर यांनी महाव्यवस्थापकांचे आणि अध्यक्षांचे अभिनंदन करून आभार मानले.

कामगारांचा विजयी मेळावा
येत्या रविवारी कामगारांचा मेळावा होणार असून बोनस झाला नसता तर त्या मेळाव्यात आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार होती. परंतु आता हा मेळावा विजयी मेळावा होईल, अशी प्रतिक्रिया सुहास सामंत यांनी व्यक्त केली.

22 कोटींचा भार
बेस्टमध्ये एकूण सुमारे 40 हजार कामगार असून त्यांना बोनस देण्यासाठी बेस्टला 22 कोटी खर्च करावे लागणार आहे. गेल्या वर्षी पालिकेकडून कर्ज घेऊन सानुग्रह अनुदान देण्यात आले होते, मात्र दरमहा 500 रुपये कामगारांच्या पगारातून कापून घेतले जात होते. त्यातील तीन हप्ते अजून बाकी आहेत. सन 2018-19 साठी जाहीर केलेल्या आजच्या सानुग्रह अनुदानाची रक्कम कापून घेऊ नये अशी मागणी सदस्यांनी यावेळी केली. वीज विभागातील कर्मचाऱ्यांच्या बोनसची रक्कम पुढील वर्षीच्या एआरआरमधून वसूल करता येणार आहे. त्यामुळे बेस्टला फक्त 14-15 कोटींची तजवीज करावी लागणार आहे.

सन 2009 नंतर प्रथमच सानुग्रह अनुदान
बेस्टच्या कर्मचाऱ्यांना बोनस मिळालाच पाहिजे अशीच आमची भूमिका आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही काहीतरी मार्ग काढून बोनस दिलाच असता. त्याकरिता महाव्यवस्थापकांना अनेक पर्याय समोर ठेवले. अधिकाऱयांना बोनस नंतर द्या आणि कमचाऱ्यांना आधी द्या, विकासकांकडे अडकलेले पैसे सोडवण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करून तोडगा काढा. त्यानुसार आता महाव्यवस्थापकांनी सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. सन 2009 नंतर उचल न देता केवळ सानुग्रह अनुदान देण्याचा हा निर्णय ऐतिहासिक आहे.
आशीष चेंबूरकर, बेस्ट समिती अध्यक्ष

summary- best employees got 5500 rs as bonus