
रेल्वेनंतर मुंबईची दुसरी जीवनवाहिनी असणाऱ्य़ा ‘बेस्ट’ला आता ‘अच्छे दिन’ आले असून गेल्या सहा दिवसांत प्रवासीसंख्येत 1 लाख 47 हजारांची तर 12 लाख 95 हजारांची वाढ झाली आहे. यामुळे सद्यस्थितीत ‘बेस्ट’ची दैनंदिन प्रवासीसंख्या 25 लाख 25 हजार 74 झाली असून दररोजचे उत्पन्नही 2 कोटी 3 लाख 83 हजार 882 वर पोहोचले आहे.
मुंबईत कोरोना लॉकडाऊन काळात ‘बेस्ट’ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्य़ांसाठी आधार ठरली. सद्यस्थितीत बेस्टचे अनेक मोठे मार्ग छोटय़ा टप्प्यांनी जोडल्यामुळेही प्रवाशांची बेस्टला पसंती मिळत असल्याने प्रवासीसंख्या वाढत असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. सद्यस्थितीतही मुंबईकरांना कोरोना लसीच्या दोन मात्रा घेतल्याशिवाय लोकलमधून प्रवास करता येत नसल्याने बेस्टमधील प्रवासीसंख्येत वाढ होत आहे. प्रवासी संख्येसह बेस्टच्या महसुलातही वाढ होत जात आहे. 30 ऑगस्ट आणि 6 सप्टेंबरमधील प्रवासी आणि महसुलाची तुलना केल्यास त्यात मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे.
असे वाढले प्रवासी
30 ऑगस्ट रोजी बेस्टच्या प्रवाशांची संख्या 23 लाख 77 हजार 102 अशी नोंदवली गेली आहे. त्या तुलनेत 6 ऑगस्ट रोजी प्रवासीसंख्येत वाढ होऊन ती 25 लाख 25 हजार 074 झाली आहे.
30 ऑगस्ट रोजी बेस्टचा महसूल 1 कोटी 90 लाख 87 हजार 918 रु. होता, तर 6 सप्टेंबर रोजी महसूल 2 कोटी 3 लाख 83 हजार 882 रु. पर्यंत वाढला आहे.




























































