बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार बोनस आणि पगार, बेस्ट कामगार सेनेचा दणका

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने बेस्ट कामगार सेनेची पुनर्रचना झाल्यानंतर नव्याने जबाबदारी सोपवलेल्या पदाधिकाऱ्यांनी आज पहिलाच दणका दिला. बेस्ट प्रशासनाला धारेवर धरत कामगार आणि कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली. बेस्ट कामगारांना दिवाळीचा बोनस आणि पगार दिवाळीपूर्वीच मिळणार आहे.

शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेनेचे नवनियुक्त अध्यक्ष, शिवसेना उपनेते-आमदार सचिन अहिर, उपनेते नितीन नांदगावकर आणि सल्लागार गौरीशंकर खोत यांनी आज आजी-माजी पदाधिकाऱ्यांसोबत थेट बेस्ट व्यवस्थापक सोनिया सेठी आणि मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक भूषण गगराणी यांची भेट घेतली. बेस्ट कामगारांना दिवाळीचा बोनस आणि पगार दिवाळीपूर्वीच मिळाला पाहिजे अशी आग्रही मागणी त्यांनी केली. बेस्ट कामगार सेनेची ही मागणी प्रशासनाने तातडीने मान्य केली. बेस्ट कर्मचाऱ्यांना येत्या 10 ऑक्टोबर रोजी पगार देण्यात येईल असे आश्वासन यावेळी प्रशासनाकडून देण्यात आले.

कामगारांना 40 हजार रुपये सानुग्रह अनुदान द्या!

सन 2025 मध्ये सर्व कामगार कर्मचाऱ्यांना 40 हजार रुपये सानुग्रह अनुदान मंजूर करून दिवाळीपूर्वीच त्याचे वाटप करण्यात यावे आणि त्यासाठी निधीचे नियोजन करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात यावेत अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे. याप्रसंगी माजी नगरसेवक व बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ, रंजन चौधरी, देवदास कांबळे आदी उपस्थित होते.