‘बेस्ट’चा कारभार सुधारण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वेनंतर मुंबईची दुसरी लाइफलाइन असलेल्या ‘बेस्ट’च्या स्वतःच्या मालकीच्या गाडय़ांचा ताफा घटला असून कर्मचाऱयांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर आज ‘बेस्ट’ कामगार सेनेने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी प्रशासनासोबत आवश्यक त्या सर्व टप्प्यांवर पाठपुरावा करून ‘बेस्ट’ला गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ठाम आश्वासन  आदित्य ठाकरे यांनी दिल्याचे ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष सुहास सामंत यांनी सांगितले.

‘बेस्ट’च्या विविध प्रश्नांबाबत ‘बेस्ट कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने ‘मातोश्री’ निवासस्थानी आदित्य ठाकरे यांची भेट घेतली.  बेस्टने स्वतःच्या मालकीच्या 3337 बसगाडय़ांच्या ताफ्याची संख्या टिकवण्यासाठी आवश्यक निधी मिळवून देण्याची गरज आहे. शिवाय बेस्टमध्ये कर्मचाऱयांची पर्मनंट भरती करणे, कर्मचाऱयांची रखडलेली प्रमोशन देणे, वेतन कराराची थकबाकी देणे, ग्रॅच्युइटीकरता निधी उपलब्ध करून देणे अशा विषयांवर चर्चा करण्यात आली. या सर्व विषयांची गंभीर दखल घेत महानगरपालिका आणि राज्य सरकारच्या पातळीव आवश्यक पाठपुरावा करणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. यावेळी ‘बेस्ट’ समितीचे माजी अध्यक्ष आशीष चेंबूरकर, अनिल कोकीळ, अनिल पाटणकर, ‘बेस्ट’ कामगार सेनेचे सरचिटणीस रंजन चौधरी, उपाध्यक्ष उमेश सारंग, गणेश शिंदे उपस्थित होते.

कंत्राटी कामगारांना आता बेस्टच्या बसेसने मोफत प्रवास

बेस्ट उपक्रमातील कंत्राटी पद्धतीने काम करणाऱया कंत्राटी कामगारांना आता 1 नोव्हेंबरपासून मोफत बस प्रवास करता येणार आहे. कामगारांनी या मागणीसाठी केलेल्या आंदोलनाला बेस्ट कामगार सेनेकडून पाठिंबा देण्यात आला होता. शिवाय आयुक्तांसह प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. यामुळे कामगारांना एसी व विना एसी बसने मोफत प्रवास करता येणार आहे. यासाठीच्या बसपासचे मासिक शुल्क 375 रुपये हे ही रक्कम संबंधित कंपनी बेस्टला देणार आहे.