बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा जोरात! वेतन कराराला बेस्ट समितीची अखेर मंजुरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
best-fin

बेस्ट कामगारांना सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर 5 ते 12 हजार रुपयांची घसघशीत वाढ देण्याच्या प्रस्तावाला शुक्रवारी बेस्ट समितीच्या बैठकीत अखेर मंजुरी देण्यात आली. ही वेतनवाढ सप्टेंबर 2019 च्या महिन्यात दिली असून ती ऑक्टोबर महिन्यात मिळणार असल्याने कामगारांची दिवाळी यंदा गोड होणार आहे.
बेस्ट कामगारांचा 2016 पासून रखडलेला ऐतिहासिक वेतन करार गेल्या आठवड्यात अस्तित्वात आला. सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर सुमारे 5 ते 12 हजार रुपयांची वाढ देण्यात आलेली आहे. या कराराला अखेर शुक्रवारी मंजुरी मिळाली.
या प्रस्तावावर बोलताना सदस्य सुनील गणाचार्य यांनी यासंदर्भात घाईघाईने निर्णय न घेता सर्व कामगारांशी बोलून निर्णय घ्यावा अशी मागणी केली. वीज कामगार जीवावर उदार होऊन काम करीत असतात, त्यामुळे त्यांना विशेष भत्ते दिले जातात. त्या भत्त्यांचा करारात उल्लेख आहे काय, असा सवाल गणाचार्य यांनी केला. हा करार तब्बल 41 महिने लांबलाय. विविध संघटनांनी आपआपले वेतन करार प्रशासनास सादर केले असून आता आणखी अडवणूक करून कामगारांचा किती अंत पाहणार असे सदस्य सुहास सामंत यांनी म्हणाले. ज्या संघटनांनी वेतनकरार केला केवळ त्यांनाच हा करार लागू होणार का, इतर कर्मचाऱ्याचे काय? यामुळे प्रशासनावर किती बोजा पडणार असे सदस्य रवी राजा यांनी विचारले.

25 सप्टेंबरपर्यंत युनियनशी चर्चा

प्रशासनाने सर्व युनियनशी चर्चा करून सामंजस्य करार केला असल्याचे सांगत कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या जवळपास वाढ देण्यात आल्याचे स्पष्ट केले. वीज कर्मचाऱ्यांचे कोणतेही भत्ते रद्द केले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. करारामुळे बेस्टवर पाच वर्षांचा येणारा बोजा आणि बेस्टला निरंतर सेवा देता येईल हे विचारात घेऊनच वेतन करार झाला असून 25 सप्टेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांना त्यावर निर्णय घ्यायचा असल्याचे बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी स्पष्ट केले.