‘बेस्ट’ भाडेवाढ नाही; स्टॉपवर पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम!

1214
best-bus

रेल्वेनंतर मुंबईची दुसरी लाइफलाइन असलेल्या ‘बेस्ट’चे भाडे आगामी वर्षात वाढणार नसून प्रवाशांच्या माहितीसाठी स्टॉपवर पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम बसविण्यात येणार असल्याचे ‘बेस्ट’ प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ‘बेस्ट’ महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी मंगळवारी ‘बेस्ट’ समितीच्या बैठकीत 7808.65 कोटींचा अर्थसंकल्प ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांना सादर केला. यामध्ये इलेक्ट्रिक सप्लाय आणि परिवहन (बेस्ट) विभागाच्या 2020-21 च्या अर्थसंकल्पात एकूण तूट 2249.74 कोटी दाखवण्यात आली आहे.

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात ‘बेस्ट’चा अर्थसंकल्प सादर केला जातो. मात्र या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अर्थसंकल्प सादर करण्यात आला नव्हता. 10 ऑक्टोबर रोजी हा अर्थसंकल्प बेस्ट समितीत सीलबंदरीत्या केवळ मांडण्यात आला होता. हा अर्थसंकल्प मंगळवारी रीतसर ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांना सादर करण्यात आला. यामध्ये बेस्टच्या मोठय़ा गाडय़ांची संख्या 3200 वरून सहा हजार होणार असल्याचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी स्पष्ट केले. प्रवाशांना आपल्या मार्गाची माहिती मिळाली, बस किती वेळात स्टॉपवर येणार, किती वेळात आवश्यक ठिकाणी पोहोचणार याची माहिती देण्यासाठी प्रणाली सुरू करणार असल्याचेही म्हणाले.

अर्थसंकल्पात अंदाजिण्यात आलेली तूट बेस्टच्या ताफ्यात येणाऱया भाडय़ाच्या बसेसमुळे अपेक्षित धरण्यात आली आहे. सध्या परिवहन विभागात 2200 कोटी रुपयांची तूट आहे, मात्र 2020-21 मध्ये भाडय़ाच्या बसेस आल्यानंतर सुरुवातीला 1000 कोटींची तूट अंदाजिण्यात आली आहे.

विद्युत विभाग फायद्यात
अर्थसंकल्पात 2020-21 साठी विद्युत पुरवठा विभागाचे उत्पन्न रुपये 4063.00, तर खर्च रुपये 3963.27 दर्शविण्यात आला आहे. त्यामुळे विद्युत विभागात रु. 99.73 रुपये शिल्लक दाखविण्यात आली आहे. मात्र ही शिल्लक विद्युत पुरवठा विभागाच्या भांडवली खर्चाकरिता वापरण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

परिवहन विभागाची स्थिती
परिवहन विभागाचे उत्पन्न रु. 1495.91 कोटी, तर खर्च रु. 3845.38 कोटी दर्शविण्यात आला आहे. त्यामुळे परिवहन विभागात रु. 2349.47 कोटींची तूट दाखवण्यात आली आहे. विद्युत आणि परिवहन मिळून 5558.91 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आले असून 7808.65 रुपये खर्च दर्शविण्यात आला आहे. त्यामुळे एकूण दर्शविण्यात आलेली तूट परिवहन विभागाशीच संबंधित आहे.

आपली प्रतिक्रिया द्या