ट्राफिकमध्ये अडकली तरी बसची नेमकी वेळ कळणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेस्टने मुंबईकरांच्या सोयीसाठी मोबाईल ऍप विकसित केले आहे. त्याद्वारे बसथांब्यावर कितव्या मिनिटाला पोहचणार हे समजणार आहे. या ऍपमध्ये ट्रफिक जाममध्ये जरी बस अडकली तरी तिला गर्दीतून येण्यास लागणारा खरा वेळ आता प्रवाशांना आपल्या मोबाईलवर समजणार असून त्यासाठी गुगलबरोबर करार करण्यात येणार आहे.

बेस्टने आपल्या गाडय़ांचे रिअल टाइम लोकेशन कळण्यासाठी व्हेईकल ट्रकिंग सिस्टीमवर आधारीत बस ट्रकिंग ऍप विकसित केले आहे. यासाठी आवश्यक इंटेलिजिंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) प्रकल्पाचे सादरीकरण शुक्रवारी बेस्ट समितीच्या बैठकीत करण्यात आले. या आयटीएमएस प्रकल्पाचे कमांड सेंटर वडाळ डेपोतील टेक्निकल ट्रेनिंग सेंटरमध्ये होणार आहे. यासाठी प्रत्येक बसमध्ये जीपीएस यंत्रणा बसविली जाणार असून त्या बसमधून निघणाऱया सिग्नलमुळे प्रवाशांना मोबाईल ऍपवर येणाऱया बसेसची रियल टाइम बेसिसवर माहिती मिळणार आहे. मात्र मुंबईत ट्रफिक जामची समस्या असल्याने बसथांब्यावर प्रवासी ताटकळत राहून रियल टाइम लोकेशनचा उपयोग होणार नाही. त्यामुळे गर्दीचा अंदाज घेऊन बस किती वेळात पोहचेल हे समजण्यासाठी गुगलच्या क्राऊड डाटाशी हे ऍप संलग्न करण्याची सूचना बहुतांशी सदस्यांनी बेस्ट समितीत केली. अशा प्रकारे अर्धवट ऍप आणले तर प्रवाशांचा भ्रमनिरास होईल असे यावेळी सदस्य आशीष चेंबूरकर यांनी स्पष्ट केले. अनिल कोकीळ यांनी या म्हणण्यास पाठिंबा देत तुकडय़ा तुकडय़ात ऍप न आणता संपूर्ण सुसज्ज ऍप आणावे अशी मागणी केली. त्यावर या ऍपला सुधारित करून गुगलच्या क्राऊड डाटाशी संलग्न करण्यात येऊन समितीची मंजुरी घ्यावी, असे आदेश बेस्टचे अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी दिले.

200 बसथांब्यांवर डिजिटल बोर्ड
बेस्ट बसच्या अपेक्षित वेळा पाहण्यासाठी मोबाईल ज्यांच्याकडे नसेल त्यांच्यासाठी प्रथम सहा हजार बसथांब्यांपैकी 200 बसथांब्यांवर जिओ टॅगिंग करण्यात येऊन बसेसचे रिअल टाइम लोकेशन बोर्डवर दिसणार आहे. या ऍपमध्ये बसथांबा आल्यास अलार्म वाजण्याचेही ऑप्शन देण्यात आले असून बसमध्ये काही वस्तू विसरल्यास त्याची ऑनलाइन तक्रारही करता येणार आहे.