बेस्टच्या कंत्राटी चालकांचे शिवाजीनगर आगारात काम बंद आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नेहमीच पगार आणि इतर देण्यांवरून आंदोलन पुकारणाऱया बेस्टच्या कंत्राटी चालक आणि वाहकांनी आता त्यांना बेस्ट प्रवासाची मोफत सवलत दिली जात नसल्याच्या निषेर्धात शुक्रवारी शिवाजीनगर आगारात काम बंद आंदोलन करीत प्रवाशांना वेठीस धरले. या आंदोलनामुळे 100 मिनी आणि मिडी बसेस आगाराबाहेर निघू शकल्या नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

बेस्टमध्ये वेटलिजवर कंत्राटी बसचालकांची भरती केली असून गेल्या दोन वर्षांपासून हे कर्मचारी तुटपुंज्या पगाराच्या मुद्दय़ावर आंदोलन करीत आहेत. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई केली आहे. शुक्रवारी शिवाजीनगरातील कंत्राटी चालकांनी त्यांना बसचे तिकीट आकारात असल्याच्या निषेधार्थ आंदोलन केले. त्यामुळे शंभरहून अधिक फेऱयांना प्रवाशांना मुकावे लागले. या कामगारांच्या कंत्राटदाराने कर्मचाऱयांना ‘चलो पास’ देण्याचे आश्वासन दिल्याने अखेर हे आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली आहे. संबंधित कंत्राटदारावर याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचेही बेस्टच्या सूत्रांनी स्पष्ट केले.