
आयपीएल व अन्य क्रिकेटच्या सामन्यावर सट्टेबाजी करणारे रॅकेट धर्माबाद शहरात असल्याची माहिती नांदेड पोलीस व तेलंगणा पोलिसांना मिळाली होती. यातील एका आरोपीला तीन दिवसापूर्वी अटक करण्यात आली. मंगळवारी दुसरा आरोपी मनोज मानधनी याला अटक करण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद या शहरात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय चालतात. तसेच मोठ्या प्रमाणात क्रिकेटच्या सामन्यावर सट्टेबाजीही होते. यात तेलंगणा राज्यातील निजामाबाद जिल्ह्यातील अनेक जणांचे संसार उदध्वस्त झाले आहेत. सट्टेबाजीचा हा खेळ करोडो रुपयांचा आहे. यातील एक आरोपी सचिन उत्तरवार यास तीन दिवसांपूर्वी अटक झाल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीनुसार आणखी काही आरोपींना अटक करण्यासाठी तेलंगणा पोलीसचे वरिष्ठ अधिकारी श्रीनिवास राव आपल्या पथकासह जिल्ह्यात दाखल झाले.
मनोज मानधनी हा आपल्या घरात बाहेरुन कुलूप लावून आत बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांनी आवाज देवून देखील त्याने दरवाजा उघडला नव्हता. अखेर पंचासमक्ष या घराचे कुलूप तोडण्यात आले आणि मानधनीला अटक करण्यात आली. यातील आणखी काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता असून काही आरोपी हे परदेशात पळून गेल्याची माहिती मिळाली आहे. या गुन्ह्यातील इतर आरोपी अद्याप फरार असून त्यांच्या अटकेसाठी पोलीस विभागाची पथक कार्यरत करण्यात आली आहेत. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर आणि निझामाबाद पोलिसांनी ही कारवाई केली. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके तैनात करण्यात आली आहेत.


























































