
रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य खाते आता नवे विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार डॉक्टरांवरील हल्ला हा अजामीनपात्र गुन्हा मानून हल्लेखोराला 10 वर्षांची शिक्षा आणि 10 लाखांचा दंड केला जाऊ शकतो.
केंद्रीय आरोग्य खात्याने ‘हेल्थकेअर सर्व्हिस पर्सनल ऍण्ड क्लिनिकल ऍस्टॉब्लिशमेंट (प्रोहिबिशन ऑफ व्हायलेन्स ऍण्ड डॅमेज ऑफ प्रॉपर्टी) विधेयक 2019’ या प्रस्तावित विधेयकाचा मसुदा तयार केला आहे. त्यावर 30 दिवसांत सर्वसामान्यांच्या सूचना मागवल्या आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर हल्ले आणि रुग्णालयाच्या तोडफोडीच्या घटना घडतात. अशा घटनांच्या विरोधात डॉक्टरांच्या संघटनांकडून देशव्यापी संप पुकारले जातात. त्यामुळे रुग्णांचेही प्रचंड हाल होतात. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी कठोर कायदा करावा, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने अनेकदा केली होती. त्या पार्श्वभूमीवर या प्रस्तावित विधेयकात तरतुदी करण्यात आल्या आहेत.
- डॉक्टर किंवा रुग्णालयातील वैद्यकीय सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्याची मारहाण झाल्यास हल्लेखोराला तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. मात्र ही शिक्षा 10 वर्षांपर्यंत वाढवली जाऊ शकते.
- शिक्षेबरोबर दोन लाख रुपये दंड ठोठावला जाऊ शकतो आणि दंडाच्या रकमेत 10 लाखांपर्यंत वाढ केली जाऊ शकते.
























































