सावधान! राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार, ‘सतर्क’ने वर्तवला अंदाज

मुंबईसह महाराष्ट्रामध्ये या आठवड्याची सुरुवात दमदार पावसाने झालेली आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसाच्या धर्तीवर ‘सतर्क’ने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. सतर्कच्या अहवालानुसार ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, अहिल्यानगर, सोलापूर, पुणे, सातारा, धाराशिव, लातूर मध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

पावसाच्या धर्तीवर हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. शहरात झालेल्या या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचण्याची शक्यता असून, वाहतूक व्यवस्थेत काही प्रमाणात अडथळे येऊ शकतात असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. पुढील 3 ते 4 तासांत शहरातील काही ठिकाणी 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. तसेच सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाट होण्याची शक्यताही वर्तवली आहे. नागरिकांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.