
औसा तालुक्यातील भादा येथील शेतकरी भीमा राजेंद्र शिंदे यांनी 3 एकरवर टोमॅटोची लागवड केली. टोमॅटो सध्या विक्रीसाठी उपलब्ध आले असता जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या विषाणूंचा नायनाट करण्यासाठी बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे भाजीपाला मागणी कमी असल्याने त्यांना या टोमॅटोचा शेतातच लाल चिखल करण्याची वेळ आलेली आहे.
टोमॅटो लागवडीसाठी मल्चिंग आतून फवारणी बांबू उभे करून दोरीच्या साह्याने टोमॅटोची बांधणी व मजूर वर्ग इत्यादी सर्व मिळून सुमारे त्यांना तीन एकरसाठी 80 हजार रुपये खर्च आला. आता सध्या तो टोमॅटो तोडणीसाठी आलेले आहेत त्यांचा पहिला तोडा सध्या 600 ते 700 कॅरेट निघेल अशी शाश्वती शेतकऱ्यांना आहे. कोरोनामुळे सर्वत्र हाहाकार माजल्याने शेतकऱ्यांना हे टोमॅटो आपल्या शेतातच नाईलाजास्तव नष्ट करावे लागत आहेत.
शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकलेले टोमॅटो व्यापारी दलालामार्फत अत्यंत कवडी मोलाच्या भावात सध्या प्रति कॅरेट 50 ते 60 रुपये टोमॅटो खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या विषाणूमुळे हिरावून घेत असल्याची चिन्ह तालुक्यासह या परिसरात भाजीपाला विक्री त्यावर कोसळलेले दिसत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असलेला शेती हा मुख्य व्यवसाय नुकसानीत चालला आहे. भीमा राजेंद्र शिंदे यांनी सामनाशी बोलताना सांगितले की, कोरोना विषाणूंचा नायनाट झाल्यानंतर सरकारने आमच्याकडे मदतीचा हात करावा. आमच्या झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी, अशी मागणी आम्ही करत आहोत.























































