गीताबोध – आपण सारेच गुलाम…

>> गुरुनाथ तेंडुलकर

कुरुक्षेत्रावर महाभारत युद्धाच्या आरंभीच भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यात झालेला संवाद श्री व्यासमुनींनी महाभारत ग्रंथात ग्रंथित करून ठेवला आहे. महाभारतात एकूण 18 पर्व (विभाग) आहेत. त्यातील प्रत्येक पर्वात अनेक अध्याय आहेत. त्यातील एका पर्वाचं नाव आहे भीष्मपर्व. या भीष्मपर्वात 122 अध्याय आहेत. त्यातील अध्याय क्रमांक 23 ते 40 हे 18 अध्याय म्हणजेच भगवद्गीता.

या भगवद्गीतेच्या माध्यामतून महर्षी श्री वेदव्यासमुनींनी भगवंतांच्या मुखातून संपूर्ण मानवजातीला उन्नतीच्या मार्गावर नेणारी सूत्रं सांगितली आहेत. ही सगळी सूत्रं आणि हा उपदेश नीट समजून घ्यायचा असेल तर त्यासाठी काहीतरी किमान योग्यता आवश्यक आहे, ती म्हणजे स्थितप्रज्ञाची लक्षणं समजून घेणं. म्हणूनच भगवद्गीतेतील दुसऱया अध्यायात स्थितप्रज्ञाची लक्षणं समजावण्यासाठी भगवंतांनी 18 श्लोक सांगितले आहेत. सध्या आपण ही स्थितप्रज्ञाची लक्षणं समजून घेत आहोत.

मागील काही लेखांमधून आपण व्यसनाबद्दल जाणून घेतले. व्यसन जडलेला माणूस हा इंद्रियांचा गुलाम बनतो. मनात इच्छा असूनही त्याचा मनोनिग्रह टिकत नाही हे थोडक्यात जाणून घेतलं. तुम्ही आम्ही सामान्य माणसं आहोत. आपल्याला `व्यसनी’ असं लेबल लागलं नाही तरीही आपण कोणत्या ना कोणत्या तरी सवयीचे गुलाम असतोच असतो. या सवयी वरकरणी निरुपद्रवी वाटणाऱया असल्या तरी अनेकदा त्या सवयींचे दूरगामी परिणाम फार फार घातक असू शकतात.

कुणी म्हणतो, “सकाळी उठल्याबरोबर चहा प्यायल्याखेरीज मला कोणतंच काम करायला जमत नाही.” काही जण म्हणतात, “सिगारेट ओढल्याशिवाय मला शौचाला होत नाही.” कुणी म्हणतं, “जेवणात लोणचं नसेल तर मला जेवण जात नाही.” अशा प्रकारच्या अनेक लहानमोठय़ा सवयी आपल्यापैकी बहुतेकांना असतात. काही सवयी अगदीच निरुपद्रवी आणि किरकोळ वाटतात, तर काही सवयी या आरोग्यविघातक आणि समाजविघातकदेखील असू शकतात. सुरुवातील किरकोळ भासणाऱया या सवयी हळूहळू आपल्या आयुष्याचा ताबा घेतात त्या वेळी मात्र त्यांना व्यसन असंच म्हणावं लागतं.

सुरुवातीला किरकोळ भासणाऱया या सवयी हळूहळू व्यसनात बदलतात. त्या गोष्टी केल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. व्यसन या शब्दाची कक्षा केवळ सिगारेट, जुगार, बाई-बाटली, तमाशा एवढीच मर्यादित नाहीये, तर झोमॅटो आणि स्वीगीवरून आठवडय़ातून दोन-तीन वेळा हॉटेलमधून चमचमीत पदार्थ मागवून खाणं, ओळखीतल्या एखाद्याबद्दल चहाडय़ा करणं, कुचाळक्या करणं आणि त्यातून स्वतची दोन घटका करमणूक करून घेणं हेदेखील एक व्यसनच. ही यादी खूप मोठी होऊ शकेल.

ज्या सवयी सुरुवातीला सुखकारक वाटतात, पण ज्यांचे दूरगामी परिणाम क्लेशकारकच असतात अशी प्रत्येक सवय म्हणजे व्यसन. आपण सगळेच जण कोणत्या ना कोणत्या तरी व्यसनाचे गुलाम असतो.

या व्यसनाच्या गुलामगिरीतून मुक्तता होण्यासाठी भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेतील पुढील श्लोकात सांगतात…

तानि सर्वांणि संयम्य युक्त आसीत मत्पर। 

वशे हि यस्य इंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ।। (2-61) 

भावार्थ – म्हणूनच योगयुक्त होऊन या सर्व इंद्रियांचे योग्य प्रकारच्या संयमाने दमन करून माझ्याकडे (इथे भगवान श्रीकृष्ण म्हणजे केवळ व्यक्ती नसून साक्षात परमात्मा या भावनेतून सांगताहेत.) मन स्थिर करावे. मन स्थिर झाले म्हणजे हळूहळू इंद्रिये ताब्यात येतील आणि इंद्रिये ज्याच्या स्वाधीन झालेली असतात अशा माणसाची बुद्धी स्थिर होते.

विनोबांच्या भाषेत सांगायचं तर `इंद्रिये जिंकिली ज्याने, त्याची प्रज्ञा स्थिरावली.’

या श्लोकावर भाष्य करताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात….

येऱहवीं बाह्य विषय तरी नाही।  

परी मानसीं होईल जरी कांही।  

तरी साद्यंतुचि पाही।  

संसारु असे।। 

जैसा का विषाचा लेशु।  

घेतलियां होय बहुवसु।  

मग निभ्रांत करी नाशु।  

जीवितासि।। 

तैसी विषयाची शंका।  

मनी वसती ते देखा।  

घातु करी अशेखा।  

विवेकजाता।। 

भावार्थ – जसा वरकरणी किरकोळ वाटणारा जालीम विषाचा एक थेंबदेखील शरीरात विस्तार पावतो आणि प्राणांचा घात करतो, त्याप्रमाणे विषय वासनांची चुटपुटती शंकादेखील मनात शिल्लक उरली तर पुढेमागे ती आयुष्याचा घात करते हे निश्चितच.

म्हणूनच घातक गोष्टींच्या बाबतीत आणि विघातक व्यक्तींबरोबर व्यवहार करताना `माझा स्वतवर ताबा आहे’ अशी बढाई कधीच मारू नये. असंगाशी संग कधीच करू नये. अयोग्य व्यक्तींशी मैत्री करूच नये आणि झाल्यास ताबडतोब तोडावी. चटक लावणाऱया गोष्टींपासून दोन कोस दूरच राहावं. अन्यथा…

यानंतरच्या पुढच्या श्लोकातून भगवान दैनंदिन जीवनात व्यवहार करताना सावधगिरी कशी बाळगावी आणि ती न बाळगल्यास माणसाचा अधपात कसा होतो ते समजावणार आहेत. किंबहुना सर्वनाशाच्या सर्व पायऱया टप्याटप्यानं सांगणार आहेत.

[email protected]