घरातील भिंतीवर साकारले रामायण! अमरावतीची भाग्यश्री जपतेय वारली चित्रकला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रभू श्रीरामाच्या जन्मापासून ते लंकाधीश रावणाच्या वधापर्यंतचे रामायणातील विविध प्रसंग घरातील भिंतींवर साकारण्याची किमया अमरावतीच्या भाग्यश्री पटवर्धन या तरुणीने केली आहे. लॉकडाऊनमध्ये मिळालेला मोकळा वेळ सत्कारणी लावत तिने वारली पेंटिंगच्या माध्यमातून हे प्रसंग उभे केले आहेत. तिची ही कलाकृती सध्या अमरावतीकरांच्या आकर्षणाचा विषय ठरतेय.

27 वर्षीय भाग्यश्री ही ट्रॅव्हल फोटोग्राफर आणि इलस्ट्रेशन आर्टिस्ट म्हणून काम करतेय. पुण्यात तिची ट्रव्हल कंपनी आहे. कोरोनामुळे पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसल्यामुळे वर्षभरापासून ती अमरावतीतील घरी परतली आहे. याबाबत दैनिक ‘सामना’शी बोलताना भाग्यश्री म्हणाली, ‘‘लहानपणापासूनच मला चित्रकलेची आवड. कॉलेजला गेल्यानंतर मी स्वतःहून वारली पेंटिंग शिकले. सध्या कोरोनामुळे आजूबाजूला नकारात्मक वातावरण पसरले आहे. त्यामुळे अमरावतीत परतल्यानंतर मी फ्री लान्स इलस्ट्रेशनमध्ये काम केले आणि फावल्या वेळेत मन शांत ठेवण्यासाठी चित्रकलेची मदत घेतली.’’

श्रीरामाचा जन्म, सीता स्वयंवर, वनवास, सीता हरण, जटायूचे रावणासोबतचे युद्ध, राम सेतू, राम-रावण युद्ध अशा रामायणातील विविध प्रसंगांसोबतच दशावतार आणि चैत्रांगण भाग्यश्रीने वारली पेंटिंगच्या माध्यमातून घराच्या कंपाऊंडमधील भिंतींवर साकारले आहेत. यासाठी तिला पंधरा दिवसांचा कालावधी लागला.

दया, प्रेम,संयम, भक्ती आदी गोष्टी आपण ‘रामायणा’तून शिकतो. मत्सर, अहंकार, क्रोध या गोष्टींचा त्याग किती महत्त्वाचा असतो हेदेखील रामायणामुळे कळतं. त्यामुळे सध्याच्या नकारात्मक वातावरणात या कथेतून सतत मला प्रेरणा मिळत राहावी यासाठी भिंतीवर रामायणाची कलाकृती साकारण्याची मला कल्पना सुचली.
– भाग्यश्री पटवर्धन