Video : राम मंदिरासाठी तातडीने कायदा करावा, आरएसएस मागणीवर ठाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नागपूर

राम मंदिरासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच अध्यादेश आणण्यात येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले असले तरीही राम मंदिरासाठी तातडीने कायदा करावा, या मागणीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठाम आहे, असे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी नागपुरात स्पष्ट केले.

धरमपेठ विज्ञान कॉलेजच्या सुवर्ण महोत्सवाच्या उद्घाटनानंतर पत्रकारांशी बोलताना भैयाजी जोशी यांनी राम मंदिराबाबत संघाची भूमिका नव्याने स्पष्ट केली. ते म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी नेमके काय वक्तव्य केले ते मला माहीत नाही. परंतु, राम मंदिरासाठी कायदा करावा, ही आमची मागणी आहे. या मागणीवर आम्ही ठाम आहोत.

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी राम मंदिरासाठी लडेंगे और अडेंगे अशी घोषणा केली होती. तर पंतप्रधान मोदी यांच्या विधानानंतर संघ आणि मोदी सरकार यांच्यातील राम मंदिरावरील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यासंदर्भात भैयाजी जोशी यांना विचारले असता, राम मंदिरासाठी आम्ही आग्रही आहोत आणि प्रसंगी त्यासाठी सरसंघचालकांनी घोषित केल्याप्रमाणे हम अडेंगे, असे ते म्हणाले.