भाल विठ्ठलवाडी येथील खारबंदिस्ती खचली, वाशी विभागातील अनेक गावे पाण्याखाली जाण्याची भीती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पेण तालुक्यातील बहिराम कोटक येथील खारबंदिस्ती खचल्याची घटना ताजी असतानाच भाल विठ्ठलवाडी येथील खारबंदिस्ती खचल्याने वाशी विभागातील अनेक गावे पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र जागतिक बँकेचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले आहेत. खारेपाणी शिरून हजारो हेक्टर शेतीचेही नुकसान होणार आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रांताधिकारी प्रविण पवार, तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे, नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, पंचायतीचे अधिकारी प्रसाद म्हात्रे  खारलँन्डचे अधिकारी सोनटक्के, सर्कल सुरेंद्र  ठाकूर, तलाठी आदिंनी सदरच्या खचलेल्या बंदिस्तीची पाहणी केली.

 या बाबत सविस्तर वृत्त असे की, पेण तालुक्यातील नारवेल-बेनवले येथे राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प महाराष्ट्र, जागतिक बँक सहाय्यता अंतर्गत 16.44 किलोमीटरच्या खारबंदिस्तीचे काम सुरू असतानाच विठ्ठलवाडी येथील खारबंदिस्ती खचली आहे. यामुळे येथील अनेक गावांना पुराचा धोका निर्माण झाल्याने पेणचे प्रांताधिकारी प्रविण पवार, तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे तहसिलदार यांनी अष्टविनायक वाडी, सागरवाडी, विठ्ठलवाडी, मोठेभाल, तुकाराम वाडी, कान्होबा, लाखोले, ठाकूरबेडी येथील हजारो ग्रामस्थांना घर खाली करून स्थलांतरित होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रशासनाच्या वतीने वढाव येथील जिल्हा परिषदेच्या व एका खाजगी शाळेत ग्रामस्थांची तात्पुरता राहण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच खारलँन्ड विभागाने तातडीने युद्धपातळीवर काम पूर्ण करून घ्यावे असे आदेश प्रांताधिकारी यांनी दिले आहेत.

 भाल येथील खारबंदिस्ती खचल्याची माहिती समजताच शिवसेनेचे संपर्कप्रमुख विष्णू पाटील, पेणचे माजी नगराध्यक्ष शिशिर धारकर, जिल्हा समन्वयक नरेश गावंड, विधानसभा संघटक लहू पाटील, महिला आघाडीच्या दिपश्री पोटफोडे, पेण तालुकाप्रमुख जगदीश ठाकुर, उपतालुकाप्रमुख भगवान पाटील, शिवदूत प्रदीप वर्तक बाळू पाटील, तालुका समन्वयक दिलीप पाटील, शहर प्रमुख मयुरेश चाचड, अनंत पाटील, विभागप्रमुख राजा पाटील, शाखाप्रमुख सुजित म्हात्रे यांच्यासह शिवसैनिकांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. यावेळी विष्णूभाई पाटील यांनी खार भूमी अभियंता जाधव यांच्याशी चर्चा करून पूरस्थिती उदभवु नये म्हणून तातडीने काम करावयास सांगितले. तसेच ग्रामस्थांच्या गाठीभेटी घेऊन शिवसेना आपल्याला सर्वतोपरी मदत करेल करेल अशी ग्वाही दिली.

कोट्यवधींचा घोटाळा, फिजिकल ऑडिटची मागणी

नारवेल-बेनवले खारबंदिस्ती करिता जागतिक बँकेने कोट्यवधी रुपये दिले आहेत. परंतु ही खारबंदिस्ती ठेकेदार व अधिकाऱ्यांनी मिळून भ्रष्टाचाराचे कुरण बनवले आहे. या कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट असून आंतरराष्ट्रीय एजन्सीकडून या खारबंधिस्तीच्या कामाचे फिजिकल ऑडिट करण्यात यावे. कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पेणचे माजी नगराध्यक्ष शिशिर धारकर यांनी केली.

55 कोटीच्या ऐवजी 105 कोटी देऊनही काम निकृष्ट : भरावाकरता मुरूमऐवजी शेतातील माती

खारबंदिस्तीच्या काम करिता सुरुवातीला 55 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते परंतु ठेकेदार व अधिकाऱ्यांनी मिळून सदर रक्कम 105 कोटी पर्यंत वाढवून घेतली आहे असे असताना देखील काम मात्र अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. भरावाकरता मुरूम वापरण्याऐवजी शेतातील माती वापरली आहे. त्यामुळे वारंवार हे खारबंधिस्ती फुटत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ शिवसेनेचे शिवदुत प्रदीप वर्तक यांनी केला आहे.

भ्रष्टाचाऱ्यांसाठी आम्ही घरेदारे सोडायची काय?

खारबंदिस्तीच्या कामांमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार करून हजारो नागरिकांना देशोधडीला लावणाऱ्या भ्रष्टाचारासाठी आम्ही घरेदारे सोडायची का ? असा संतप्त सवाल भाल येथील शेतकरी महेंद्र म्हात्रे यांनी केला.