
कोरोना महामारीनंतर कोकणातील नमन कलेला नवी उभारी मिळणार आहे. भालावलीचे नमन आता मुंबईची रंगभूमी गाजवण्यासाठी सज्ज झाले असून शुभारंभाचा प्रयोग उद्या, 20 एप्रिल रोजी सायंकाळी 8 वाजता बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहात सादर होणार आहे.
कोकणचे खेळे अर्थात बहुरंगी नमन ही एक कोकणची लोककला आहे. याच कलेचा वारसा श्री आई जाखादेवी कलामंच पुढे घेऊन जात आहे. कोकणातील बहुरंगी नमन मंडळाला चांगला प्रतिसाद लाभला तर बहुरंगी नमन ही कला संपूर्ण महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेर सादर करायला कोकणी कलावंताला अभिमान वाटेल. अधिकाधिक प्रेक्षकांनी प्रयोगाला येऊन होतकरू कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन कलामंचचे कार्यवाह गजानन विखापे यांनी केले आहे. शुभारंभाच्या प्रयोगावेळी मंडळाचे हितचिंतक काका कदम आणि अन्य मान्यवर उपस्थित राहतील.
रत्नागिरी जिह्यातील राजापूर तालुक्यातील भालावली या गावातील शाळेतील माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी एकत्र येऊन कोकणची कला जोपासायचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने लेखक-दिग्दर्शक विजय चौगुले, महेंद्र जोशी, भरत गुरव, योगेश विखापे, गजानन विखापे, विश्वास गुरव, सचिन सांडये, दीपक सांडये आदी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन श्री आई जाखादेवी कलामंच, मुंबई या कलामंचाची स्थापना 2019 मध्ये केली मध्यंतरी कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे कला सादर झाली नाही.

























































