सांत्वनासाठी शब्दच नव्हते, फक्त हात जोडून उभा राहिलो!! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भावव्याकुळ!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘पहिलंवहिलं लेकरू वं…काळजाला चटका लावून गेलं… जग पन पाहिलं नव्हतं त्येनं… बरं झालं हुतं… घरी आननार हुतो… पन गेलं सोडून…शेवटचं मुख बघाया बी नाय मिळालं…’ बोलताना ओठ थरथरत होते आणि डोळय़ातून अश्रूंचा पाट वाहत होता. भंडारा जिल्हा रुग्णालयातील भीषण आगीत आपली कोवळी बाळं गमावलेल्या मातांच्या रुदनाने भोजापूरची सोनझारी वस्ती सुन्न झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर त्यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. त्यांचे शब्द काळीज पिळवटून टाकत होते. त्यांच्या वेदना ऐकून उद्धव ठाकरेही भावव्याकुळ झाले. ‘त्यावेळी सांत्वनासाठी माझ्याकडे कोणतेही शब्द नव्हते. केवळ या कुटुंबासमोर मी हात जोडून स्तब्ध उभा होतो,’ अशा भावना उद्धव ठाकरे यांनी या मातांच्या भेटीनंतर व्यक्त केल्या.

भंडारा जिल्हा रुग्णालयातील विशेष नवजात शिशू उपचार विभागात लागलेल्या आगीत आपली बाळं गमावलेल्या मातांच्या सांत्वनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोनझारी वस्तीत आले. या हृदयद्रावक दुर्घटनेत आपली पहिलीच मुलगी गमावलेल्या गीता आणि विश्वनाथ बेहेरे यांची त्यांनी भेट घेतली. दोन वर्षांपूर्वीच विवाह झालेल्या बेहेरे दांपत्याचे ते पहिलेच अपत्य. जन्मतःच बाळाचे वजन कमी असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन महिन्यांच्या उपचारानंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती, परंतु काळाने घात केला.

सीतेकसा येथील कविता बारेलाल कुमरे ही गीता बेहेरे हिच्या बाजूलाच बसली होती. तिच्या संसारवेलीवर उमललेले पहिले पुष्प या आगीत विरून गेले. कविता मोलमजुरी करून कुटुंबाचा निर्वाह करते. गेल्या महिन्यात सात तारखेला तिला मुलगी झाली होती. मुलीचे वजन कमी असल्याने तिला भंडारा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिची प्रकृती सुधारली होती आणि लवकरच तिला डिस्चार्ज मिळणार होता. परंतु रविवारी पहाटे आलेल्या त्या दुर्दैवी निरोपाने कविताचे सर्वस्व हिरावले गेले. तिला मोठा मानसिक धक्का बसला आहे.

विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, जिह्याचे पालकमंत्री डॉ. विश्वजित कदम, परिवहन मंत्री अनिल परब, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, आमदार नरेंद्र भोंडेकर आदी याप्रसंगी उपस्थित होते.

अवघा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी

उद्धव ठाकरे यांनी अशा भीषण दुःखाच्या प्रसंगी संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी असल्याचा दिलासा या दोन्ही मातांना दिला. या कुटुंबांची सर्वतोपरी काळजी घ्यावी असे आदेश त्यांनी जिल्हाधिकाऱयांना दिले. ‘या दुर्घटनेमुळे बालकांच्या कुटुंबांची झालेली हानी कधीही भरून निघणार नाही याची मला जाणीव आहे. स्वतःचं मूल अशा पद्धतीने जाणं हे अत्यंत हृदयद्रावक आहे’ अशा शब्दांत सहवेदना व्यक्त करतानाच यापुढे अशी घटना घडणार नाही असे वचनच जणू मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही मातांना दिले.

भंडारा जिल्हा रुग्णालयातील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या बालकांच्या मातांची भोजापूर सोनझारी वस्ती येथे भेट घेऊन सांत्वन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. सोबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले.