भंडारदरा धरण निम्मे भरले

पाणलोटक्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भंडारदरा धरण 50 टक्के भरले आहे. कालपासून पावसाचा जोर ओसरला असला, तरी संततधार पाऊस सुरू असल्याने धरणामध्ये पाण्याची आवक सुरू आहे.

गेल्या तीन दिवसांत झालेल्या जोरदार पावसाने मोठय़ा प्रमाणात धरणात पाणी दाखल झाले असून, पाणीसाठा 50 टक्के झाला आहे. सध्या विद्युतनिर्मितीसाठी धरणातून 850 क्युसेक पाणी सोडले जात आहे. भंडारदरा आणि मुळा खोऱ्य़ात हा पाऊस झाल्याने सर्व ओढे-नाले मोठय़ा प्रमाणात वाहून मुळा व प्रवरा नदीला मिळत असल्याने दोन्ही धरणांत पाण्याची आवक वाढत आहे. भंडारदारा पाणलोटक्षेत्रातील घाटघर, पांजरे, उडदावणे, साम्रद या परिसरातही गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर होता. दरम्यान, पावसाचा जोर ओसरूनही संततधार सुरू असल्याने पाण्याची आवक वाढत आहे.

कळसूबाई शिखर परिसर, तसेच जहागीरदारवाडी, बारी परिसरात पावसाचा जोर कमी असल्याने कळसूबाईवरून येणारी कृष्णावंती नदी मोठय़ा प्रमाणात प्रवाही नाही. त्यामुळे कृष्णावंतीवरील वाकी बंधारा अद्यापि भरलेला नाही. त्यामुळे निळवंडे धरणात अजून नवीन पाण्याची आवक झालेली नाही. तर, भंडारदरा धरणातून विद्युतनिर्मितीसाठी सोडले जात असलेले पाणी निळवंडे धरणात दाखल होत आहे.

मुळा धरण 40 टक्के भरले

घाटमाथ्यावर पाऊस टिकून असल्याने बुधवारी सकाळी कोतूळकडून मुळा धरणात पाच हजार 826 क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. मात्र, घाटमाथ्यावर पाऊस मंदावल्याने सायंकाळी सहा वाजता पाच हजार 390 क्युसेकने पाण्याची आवक झाली. गेल्या 24 तासांत मुळा धरणात 250 दशलक्ष घनफूट नवीन पाणी वाढले आहे. बुधवारी सकाळी मुळा धरणाचा पाणीसाठा 10 हजार 451 दशलक्ष घनफुटांवर जाऊन पोहोचल्याने धरणात 40 टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी मुळा धरणाच्या पाणीसाठय़ाची नऊ हजार 405 दशलक्ष घनफूट नोंद झाली होती.

आपली प्रतिक्रिया द्या