
मुंबईत रविवारी झालेल्या अतिवृष्टीत पालिकेच्या भांडूप जलशुद्धीकरण प्रकल्पालाही फटका बसून पाणीपुरवठय़ावरही परिणाम झाला. मात्र या जलशुद्धीकरण प्रकल्पात पाणी घुसल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे धरण सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे याची गंभीर दखल घेऊन व्हिडीओ बनवून व्हायरल करणाऱयांवर कारवाई करा अशी मागणी शिवसेनेने केली आहे. याबाबत सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब यांनी पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना निवेदन दिले आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात आहेत. 1993 च्या दहशतवादी हल्ल्यांनंतर धरणक्षेत्रात नागरिकांनाही फिरण्यास बंदी घालण्यात आली. या परिसरात नगरसेवकांनाही प्रशासनाच्या परवानगीशिवाय जाता येत नाही. मात्र रविवारी पालिकेच्या भांडूप जलशुद्धीकरण प्रकल्पात पाणी शिरल्याच्या प्रकाराचा व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे नगरसेवक सदानंद परब यांनी म्हटले आहे.
भांडूप संकुल व्यवस्थापन जबाबदारी घेणार का?
भांडूप संकुलात व्हिडीओ बनवणारी व्यक्ती ‘‘पुढील व्हिडीओचा भाग 2 दाखवण्यात येईल’’ असे म्हणत असल्याने हा प्रकार गंभीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे धरणक्षेत्राची सुरक्षा व्यवस्था ढेपाळली असल्याचा आरोपही सदानंद परब यांनी केला आहे. अशा व्हिडीओमुळे धरण सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यास भांडूप संकुल व्यवस्थापन जबाबदारी घेणार का? असा सवालही परब यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करून बेजबाबदारपणे व्हिडीओ बनवून व्हायरल करणाऱयांवर कारवाई करा अशी मागणीही परब यांनी आयुक्तांकडे केली आहे.




























































