सरकारी योजना शिंदे गटाच्या दावणीला; महाडमध्ये शासकीय कार्यक्रम मंत्रीपुत्राने केला हायजॅक, आवाज उठवताच शिवसेनेचे सरपंच पोलिसांच्या नजरकैदेत

महाड-मध्ये चक्क शिंदे गटाचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शासकीय कार्यक्रम हायजॅक केल्याचे समोर आले आहे. संतापजनक म्हणजे या सर्व प्रकारावर शिवसेनेचे शिरगावचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी आवाज उठवत जाब विचारला. त्यामुळे पोलिसांनी ओझर्डे यांना महाडच्या पोलीस ठाण्यात नेऊन नजरकैदेत ठेवले.

इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना घरगुती साहित्य, बांधकाम साहित्य तसेच आर्थिक लाभ देण्यात येतात. असाच एक कार्यक्रम महाड येथील विरेश्वर मंदिराच्या सभागृहात आयोजित केला होता. मात्र या कार्यक्रमाला एकाही शासकीय अधिकाऱ्याला निमंत्रित करण्यात आले नव्हते. केवळ विकास गोगावले व शिंदे गटाचे पदाधिकारीच कार्यक्रमाला उपस्थित असल्याचा आरोप सोमनाथ ओझर्डे यांनी केला आहे.

या कार्यक्रमाला आपण स्वतः उपस्थित राहणार असल्याचे जाहीर केल्यानंतर पोलिसांनी घरी येऊन आपल्याला ताब्यात घेतले आणि कार्यक्रम संपेपर्यंत पोलीस ठाण्यातच बसवल्याचे त्यांनी सांगितले. मंडळाच्या माध्यमातून लाभार्थ्यांची नोंदणी करताना त्यांना पक्षात प्रवेश करण्याची अट घातली जाते. अनेक लाभार्थी बोगस असून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप ओझर्डे यांनी केला.