अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांचं ‘अस्तित्व’, भरत जाधव वेगळ्या भूमिकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवनवीन कथा, आशय असणारी वेगवेगळ्या जॉनरची नाटके रंगभूमीवर येत असतानाच आता अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांचं अस्तित्व शोधणारे एक कौटुंबिक नाटय़ रसिकांच्या भेटीला येत आहे. भरत जाधव एण्टरटेन्मेंट निर्मित ‘अस्तित्व’ हे नाटक लवकरच नाटय़प्रेमींच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहे. स्वप्नील जाधव लिखित, दिग्दर्शित ‘अस्तित्व’ या नाटकाचा येत्या 3 नोव्हेंबर रोजी शुभारंभाचा प्रयोग असून यात चिन्मयी सुमित, सलोनी सुर्वे, हार्दिक जाधव, श्याम घोरपडे, जयराज नायर आणि भरत जाधव प्रमुख भूमिकेत आहेत.

भरत जाधव यांनी आजवर बऱयाच विनोदी भूमिका साकारल्या. नकारात्मक भूमिकाही केल्या. मात्र आता बऱयाच काळानंतर भरत जाधव या नाटकाच्या माध्यमातून एका वेगळ्याच रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ही कथा एका अशा कुटुंबाची कहाणी आहे, जे आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत आहे. कुटुंबातील एकमेव कमावणाऱया आणि नोकरीतून लवकरच निवृत्त होणाऱया संतोष हसोळकरची ही कथा आहे, ज्याने निवृत्तीनंतर मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्याच्या या निर्णयाला घरच्यांचा विरोध असून प्रत्येक जण आपल्या अस्तित्वाच्या शोधात आहे. त्यामुळे आता त्यांची ही धडपड यशस्वी होणार का? याचे उत्तर लवकरच मिळेल.