
राज्यात कोरोनाविरोधातील लढाईत प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. राज्य सरकारच्या या लढाईत अनेक स्वयंसेवी संघटना आणि संस्थांनी मदतीचा हात पुढे केला असून यात आता भारतीय कामगार सेनेच्या ग्रॅण्ड हयात युनिटनेदेखील मोलाची मदत केली आहे. युनिटतर्फे नुकतीच मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पाच लाखांची मदत केली आहे. युनिटचे प्रमुख मनोज धुमाळ यांनी नुकताच या निधीचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
राज्यात सुरू असलेल्या कोरोनाच्या लढाईत राज्य सरकारने सर्वस्व पणाला लावले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन अहोरात्र मेहनत करीत असून यात मदतीचा हात पुढे करण्यासाठी भारतीय कामगार सेनेच्या हॉटेल ग्रॅण्ड हयातचे युनिटदेखील पुढे सरसावले आहेत. यासाठी युनिटने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पाच लाखांचा निधी सुपूर्द केला आहे. याबद्दल बोलताना युनिटचे प्रमुख मनोज धुमाळ म्हणाले की, कोरोनाला अटकाव करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्यात व्यापक प्रमाणात जे प्रयत्न सुरू केलेले आहेत त्या प्रयत्नांना हातभार लावणे हे आम्हा सर्व कामगार बंधू-भगिनींचे कर्तव्य आहे. तसेच कोरोनाविरुद्धच्या लढाईस बळ मिळावे यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत त्याच भावनेतून ही मदत करण्याचे आवाहन राज्य सरकारकडूनही केलेले आहे. या आवाहनास प्रतिसाद देत हॉटेल ग्रॅण्ड हयात युनिटच्या वतीने ही मदत केलेली असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय कामगार सेना अध्यक्ष, शिवसेना प्रवक्ते अरविंद सावंत, सरचिटणीस सचिन अहिर, उपाध्यक्ष अजित साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारतीय कामगार सेना चिटणीस मनोज धुमाळ यांच्या पुढाकाराने हॉटेल ग्रॅण्ड हयात मुंबई युनिट कमिटी व कामगारांच्या वतीने कोरोनाविरोधात लढय़ासाठी सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत केली आहे.





























































