
भारतीय कामगार सेनेतर्फे मुंबई विमानतळावर दिमाखदार गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या जल्लोषात हा उत्सव पार पडला. यानिमित्ताने आयोजित मंगळागौरीच्या कार्यक्रमात शिवसेना शाखा क्र. 67 तर्फे उपशाखाप्रमुख अर्चना बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली भगिनींनी मंगळागौर सादरीकरण केले. या सादरीकरणाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व गटाला प्रथम पारितोषिकाने गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. सामाजिक व सांस्कृतिक परंपरा जपण्याच्या दृष्टीने भारतीय कामगार सेनेचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरल्याचे मत या वेळी व्यक्त करण्यात आले. याप्रसंगी नीलेश ठाणगे, विशाल पारकर, संतोष लखमटे, प्रवीण पाटील, नाना बेले आदी मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण गणेशोत्सवाचे आयोजन व मार्गदर्शन संजय शंकर कदम यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.