
ऐन हिवाळी अधिवेशनाच्या काळातच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, अंबादास दानवे यांनी एक ट्विट बॉम्ब फोडला आहे. शिंदे गटाच्या आमदाराचा नोटांच्या गड्ड्यांसह व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून वातावरण तापले आहे. अशातच आता शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते भास्कर जाधव यांनी माध्यमांशी बोलताना त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘कॅशलेस देश करायचा. कुठलाही व्यवहार कॅशने करायचा नाही आणि तुमच्याच सत्ताधारी पक्षाच्या लोकांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कॅश येते कुठून? हे काळं धन बाहेर काढण्यासाठी म्हणून तुम्ही नोटाबंदी केली होती ना?’ असा संतप्त सवाल राज्यासह देशाच्या सत्ताधारी नेतृत्त्वाला विचारला आहे.
भास्कर जाधव म्हणाले की, ‘सत्ताधारी पक्षातील एक आमदार व्हिडीओमध्ये पैशाच्या बॅगाच्या बॅगा आणि नोटाच्या नोटा तिथे ठेवून खेळताना दिसत आहेत. याचा अर्थ सत्ताधारी पक्षाकडे महाराष्ट्रामध्ये दोन नंबरचा पैसा किती आला आहे. मला देशाच्या पंतप्रधानांना विनंती वजा प्रश्न विचारायचा आहे की, आपण नोटाबंदीचा निर्णय घेतला आपण संपूर्णपणे त्या ठिकाणी डिजिटल करन्सी वापरामध्ये आणली. आता कॅशलेस देश करायचा. कुठलाही व्यवहार कॅशने करायचा नाही आणि तुमच्याच सत्ताधारी पक्षाच्या लोकांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कॅश येते कुठून? काळं धन बाहेर काढण्यासाठी म्हणून तुम्ही नोटाबंदी केली. मग या नोटा आल्या कुठून? याचे उत्तर केवळ राज्याचे नाही तर देशाच्या प्रमुखांनी देण्याची गरज आहे’.
पुढे बोलताना ‘या एवढ्या नोटा वारेमाप येतात कुठून? आणि म्हणून ज्यावेळेला काळा पैसा बाहेर काढण्याकरिता हजार पाचशेच्या नोटा बंद केल्या म्हणून सांगितल्या. त्याचवेळी देशामध्ये काही लोकांना संशय आला होता की हजार पाचशेच्या नोटा बंद केल्याचे नाटक केलं जाईल आणि प्रत्यक्षपणे या देशामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये हा पैसा बाहेर येईल आणि तो आता यायला लागला आहे’, असेही भास्कर जाधव म्हणाले.




























































