कोकण रेल्वेचे प्रश्न न सुटल्यास रेल्वे रोको करणार; मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना भास्कर जाधव यांनी धारेवर धरले

कोकण रेल्वेच्या गाड्यांचे गणेशोत्सव आणि शिमगा उत्सवाच्यावेळी आगाऊ आरक्षण पाच- सहा मिनिटात फुल्ल होते. रत्नागिरी-दादर पॅसेंजर गाडी बंद करून त्याऐवजी गोरखपूर आणि बलिया येथे गाड्या सुरू केल्या आहेत. कोकणातील प्रवाशांवर आज अन्याय होतोय. त्यांना प्रवासात हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारताना सुधारणा झाली नाही तर रेल्वे रोको करण्याचा इशारा दिला आहे.

रत्नागिरी-दादर पॅसेंजर पुन्हा दादर वरून सुरू करा. तसेच चिपळूण ते पनवेल एक नियमित गाडी सुरू करा. रत्नागिरी आणि चिपळूणसाठी तिकिटाचा आरक्षित कोटा वाढवून द्या. अंजणी रेल्वे स्थानकाला हुतात्मा अनंत कान्हेरे यांचे नाव द्यावे. गणेशोत्सव आणि शिमोगा उत्सवात आगाऊ तिकीट आरक्षण पाच मिनिटात फुल्ल होत, याबाबत आमदार भास्कर जाधव यांनी विचारणा करताना तिकिट काढण्याचा वेगळा सर्व्हर एजंटना का दिला नाही? या प्रश्नावर मध्य रेल्वेचे अधिकारी निरूत्तर झाले. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर रेल्वे रोको करण्याचा इशारा आमदार भास्कर जाधव यांनी दिला.