
फिट इंडिया मुव्हमेंट अंतर्गत आयोजित बीच क्रीडामहोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ झाला. भाट्ये समुद्रकिंनारी आज कबड्डी, व्हॉलीबॉल, खो-खो, थ्रोबॉल, लंगडी, लगोरी, तीन पायाची शर्यत, विटीदांडू, रस्सीखेच सारखे खेळ रंगले.
जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. एच. बघाटे यांच्या हस्ते या क्रिडामहोत्सवाचे उद्घाटन झाले. जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, नगरपरिषद, ग्रामपंचायत भाट्ये व व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, थ्रोबॉल, अॅथलेटिक्स, रस्सीखेच या एकविध खेळ संघटनांच्या सहकार्याने दि. 20 डिसेंबर पर्यंत दररोज दुपारी 3 ते सायंकाळी 7 यावेळात भाट्ये बीच रत्नागिरी येथे बीच गेम्सचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये बीच व्हॉलीबॉल, बीच कबड्डी, बीच खो-खो, बीच थ्रोबॉल, मैदानी स्पर्धा तसेच पारंपरिक खेळांमध्ये लंगडी, लगोरी, डॉजबॉल, तीन पायांची शर्यत, विटीदांडू, रस्सीखेच या खेळांचा समावेश आहे. दि.18 डिसेंबर रोजी 17 वर्षाखालील मुलांची मैदानी स्पर्धा, 10 वर्षे, 12 वर्षे, 14 वर्षे, 17 वर्षे मुले मुली असे गट करण्यात आले आहेत. विजयी संघांना चषक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. अस्पर्धात्मक खेळांमध्ये रस्सीखेच, लगोरी, लंगडी, रिंग टेनिक्वाईट, टांगा गाडी, तीन पायांची शर्यत, टायर फिरवणे, डॉजबॉल अशा मनोरंजनात्मकं पारंपरिक खेळांचा समावेश आहे. बीच गेम्समध्ये अधिकाधिक शाळांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडाधिकारी, रत्नागिरी यांनी केले आहे.





























































