चित्र शिल्प कला

bhavna-sonwane04मी एक व्यावसायिक चित्रकार आहे. मोठमोठे कॅनव्हास करता करता मला ग्लास इनॅमल माध्यमामध्ये भरवलेल्या काही कालाकारांचं एक प्रदर्शन पाहण्याचा योग आला. मला त्या काही ठरावीक इंचांमध्ये केली गेलेली कला खूप आवडली आणि मी हे माध्यम शिकायचं ठरवलं. चित्रकार म्हणून अभ्यासपूर्ण जोड असल्यामुळे मला या माध्यमात सुरुवातीपासूनच इतरांपेक्षा वेगळं काम करण्यास प्राधान्य देता आले. साधारण वीस वर्षांपूर्वी चित्रकलेची पदवी घेत असताना एका प्रदर्शनात एक काचेसारखं चकाकणारं काहीसं पारदर्शक पोल असलेलं जेमतेम दीड इंचाचं भडक आकर्षक पेडंट पाहिलं. त्यात ठराविक आकाराच्या उभ्या-आडव्या धातूच्या ताराही अगदी नाजूक पद्धतीने बसविल्या होत्या. मी नकळत त्या माध्यमाच्या प्रेमात पडले. कालांतराने सहज माझ्या आयुष्यात चित्रांसोबत मीनाकारीने जागा व्यापली.

एका वेळेस मोठमोठे कॅनव्हास पूर्ण करायचे. प्रदर्शित करायचे. फावल्या वेळेत इनॅमल भट्टी सुरू करायची. भट्टीचे आकारमान छोटे असल्यामुळे तेवढय़ाच आकारात काम बसवावं लागतं. मग ते छोटे छोटे पूर्ण झालेले तुकडे एकत्र करून काहीतरी मोठं भव्य असं घडवणं… असं करत दिल्ली आणि मालदिव येथे मोठय़ा हॉटेलचे प्रोजेक्टही हाताळायला मिळाले. जवळजवळ साठपेक्षा नामांकित प्रदर्शनांमध्ये चित्र आणि इनॅमल ऑन मेटलमध्ये कला प्रदर्शित करण्याची संधी मिळाली. पारंपरिक मीनाकारी आणि चित्रकाराने कौशल्य वापरून केलेली मीनाकारी यामध्ये फरक आहे, हे शिकायला मिळाले.

जसं एखादं व्यसन आपला पिच्छा सोडत नाही, तसंच माझं चित्रांच्या बाबतीत आहे. मला अधिक बांधून ठेवणारं हे माध्यम आहे. यासाठी छोटे छोटे कोर्सेसही केले. यासोबतच मी व्यावसायिक चित्रांचे भरवत होते आणि सुरुवातीला स्वयंपाक, स्टुडियो येथे माझी चित्रं लावली गेली. आता स्वतःचा स्टुडियो उभारण्यात मला यश आले आहे.

ग्लास इनॅमलिंगचा हिंदुस्थानात पदवी अभ्यासक्रम नाही. जी. डी. आर्ट किंवा बी.एफ.ए. याची जोड असेल तर काम अधिक प्रभावी स्वरुपात करायला सोपं जातं. चित्रशिल्प, मेटलक्राफ्ट या अभ्यासक्रमातील जी. डी. आर्ट किंवा बी. एफ. ए. पदवी घेतलेल्या कलाकारांना खूप उपयोगी कोर्सेस गृहिणींना छंद म्हणून जोपासता येतील. यामुळे व्यवसाय करता येईल. सेवानिवृत्तीनंतरही हा छंद जोडता येईल. सध्या फॅशन इंडस्ट्री, इंटिरीयर डिझाइनिंग आणि औद्योगिक क्षेत्रातही सफाईदारपणे ही कला वापरता येईल, असा सल्ला मी गृहिणी आणि तरुणींना देईन.