
कोरेगाव भीमा घटनेची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या चौकशी आयोगाला 31 मार्च 2021पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय गृहविभागाने घेतला आहे.
या घटनेची चौकशी करणाऱया आयोगाचे कामकाज तसेच सुनावणीला सप्टेंबर 2018मध्ये सुरुवात झाली. तेव्हापासून या आयोगाचे कामकाज सुरू आहे. पण राज्यात कोविडमुळे टाळेबंदी लागू करण्यात आली. कोविडमुळे आयोगाच्या कार्यालयात येणारे ज्येष्ठ कर्मचारी, सुनावणीसाठी येणारे साक्षीदार व वकिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने कामकाज सुरू ठेवणे जोखमीचे होते. या कालावधीत कामकाज झाले नाही. त्यामुळे कामकाज पूर्ण करण्यासाठी आता आयोगाला 31 मार्च 2021पर्यंतची शेवटची मुदतवाढ देण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. मार्चपर्यंत आयोगाने कामकाज पूर्ण करुन सरकारला अंतिम अहवाल सादर करावा असे गृह विभागाच्या शासन निर्णयात नमूद केले आहे.





























































