मराठी गझलचे वैभव पुढे न्यायचंय! भीमराव पांचाळे गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित

कारवा आहे गझलचा, जायचं आहे पुढे. मराठी गझलचे हे वैभव पुढे न्यायचे आहे. 53 वर्षांच्या वाटचालीचा हा एक छानसा विराम आहे. गुरुवर्य सुरेश भट यांच्या कार्याला मूर्तरूप देण्याच्या प्रयत्नाचा हा विराम आहे. यासाठी मी तुम्हा रसिकांचा आयुष्यभर ऋणी आहे. आज सुरेश भटांची आठवण येतेय. त्यांनी मराठी भाषेला आणि साहित्याला नवा काव्य प्रकार दिला, अशा भावना गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी व्यक्त केल्या.

लता मंगेशकर पुरस्कारांसह 60 आणि 61वा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा आज वरळी येथे रंगला. 2024चा चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार  दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर यांना तर चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री मुक्ता बर्वे हिला देऊन सन्मानित करण्यात आले. 2024चा  राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना आणि राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री काजोल हिला मिळाला.

या वेळी छत्रपती शिवाजी महाराज महावारसा या नवीन पुरस्काराची घोषणा करण्यात आली.  महाराष्ट्रातील 12 किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून नामांकित व्हावे म्हणून प्रयत्न करणारे हिंदुस्थानचे राजदूत, युनेस्कोचे कायम प्रतिनिधी विशाल शर्मा यांना हा पुरस्कार मिळाला. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ या संस्थेलाही पुरस्कार देण्यात आला.