
सामना प्रतिनिधी । जामखेड
माजलगाव (जि. बीड) येथील महिला पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके यांनी दलितांच्या विरोधी भाष्य केल्यामुळे जामखेड तालुक्यात मोठे पडसाद उमटले. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून महिला पोलीस अधिकारी नवटके यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी जामखेड तालुक्यातील भिमसैनिकांनी जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पाडुरंग पवार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
आयपीएस नवटकेंना वादग्रस्त वक्तव्य भोवले, तडकाफडकी झाली बदली
‘माझ्याकडे अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी येतात मी त्यांनाच जास्त मारते, 21 दलितांना आतापर्यंत मी फोडून काढले आहे’, अशा बेताल वक्तव्याची एक व्हिडीओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर दलित समाजाकडून महिला पोलीस अधिकारी नवटके यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात येत असून याचे पडसाद जामखेड तालुक्यात उमटले असून याबाबत जामखेड पोलिस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेली दोन दिवसापासुन फेसबुकवर व व्हाट्सअपवर व्हिडीओ प्रसारीत झाला असून या व्हिडीओमध्ये माजलगाव (जि. बीड) येथील उपविभागीय महिला पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके या दलित विरोधी बोलताना दिसत आहेत व ही खरी हकीकत आहे. जातीय प्रवृत्तीतून दलितांना बेदम मारहाण करून खोटे गुन्हे दाखल करण्याची नेहमीच त्या धमकी देतात.या आधिही त्यांनी दलित – मुस्लिम द्वेष भावना ठेवून त्रास दिलेला आहे. तसा उल्लेख सदर क्लिपमध्ये स्पष्ट दिसत आहे. एक जबाबदार महिला पोलिस अधिकारी अशा प्रकारे जातीयता बाळगून वागणूक देत असेल तर ही पोलिसी खात्याला काळीमा फासणारी घटना आहे. रक्षकच भक्षक झाल्यासारखे वागत असल्याने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून महिला पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जामखेड तालुक्यातील भिमसैनिकांनी जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पाडुरंग पवार यांना दिलेल्या निवेदनात केली असून या बाबतचे निवेदन तहसिलदार विशाल नाईकवाडे यांना देखील देण्यात आले असून या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले, बापुसाहेब गायकवाड, आर पी आय चे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, अॅड.अरूण जाधव, बाबा सोनवणे, रवि सोनवणे, योगेश सदाफुले, रत्नाकर सदाफुले, जमीर सय्यद, दादा घायतडक, राकेश साळवे, किशोर कांबळे यांच्या सह 35 भिमसैनिकांच्या सह्या आहेत.

























































