
उदय जोशी । बीड
माजलगावच्या आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटके यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. जातीवाचक वक्तव्य त्यांना भोवले असून त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. माजलगावहून त्यांची संभाजीनगर येथे बदली करण्यात आली असून गेवराईचे पोलीस उपविभागीय अधिकारी अर्जुन भोसले यांच्याकडे माजलगावचा पदभार देण्यात आला आहे.
माजलगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके यांनी दलित आणि मुस्लिम समाजाविषयी केलेल्या वक्तव्याची व्हिडिओ क्लिप गेल्या दोन दिवसापासून संपूर्ण राज्यामध्ये खळबळ उडवून देत आहे. तुम्ही मराठा समाजाचे आहेत म्हणून पाठीवर मारते, दलित समाजाच्या लोकांना मी हातपाय बांधून मारत असते. अॅट्रॉसिटी करण्यासाठी आलेल्या दलितांना मी धडा शिकवत असते. अशा प्रकारची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यानंतर दलित समाजाच्या संघटनांनी संताप व्यक्त केला होता. माजलगाव, वडवणी आदी ठिकाणी निवेदने देऊन त्यांच्या बडतर्फीची मागणी केली होती. अखेर उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके यांना हे प्रकरण भोवले असून तडकाफडकी त्यांची बदली संभाजीनगर येथे झाली असून त्यांचा पदभार गेवराईचे उपविभागीय अधिकारी अर्जुन भोसले यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
































































