घशात चॉकलेट अडकल्याने गुदमरून चार वर्षीय मुलाचा मृत्यू

1098

घराच्या अंगणात आजी आजोबांसोबत खेळता खेळता दुकानावरून आणलेले जेम्स चॉकलेट खाऊन घशात अडकल्याने श्वास गुदमरून एका चार वर्षीय मुलाचा सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पारिवली येथे घडली आहे. ऋषी सचिन लसणे (4 वर्ष ) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नांव आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर मुलगा अंगणात खेळत असताना त्याला आजीने दुकानावरून काडीपेटी आणण्यास सांगितली. ती त्याने आजीला आणून दिली.त्याने दुकानावरून येताना जेम्स चॉकलेट देखील आणले होते. दुकानावरून येऊन तो पुन्हा खेळत होता. मात्र थोड्याच वेळात त्याने आजीकडे येऊन माझ्या घशात काहीतरी अडकले आहे असे सांगितले. त्यानंतर त्याचा श्वास गुदमरून तो बेशुद्ध झाल्याने कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी प्रथम अनगांव येथे नेले. मात्र प्रकृती अधिक गंभीर झाल्याने त्याला भिवंडीतील सेंट्रल, सिराज व स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येऊन उपचाराची प्रयत्नकाष्टा करण्यात आली. मात्र सर्व प्रयत्न तोकडे पडून अखेर ऋषी याचा मृत्यू झाल्याचे सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी घोषित केले.यावेळी ऋषी याच्या मृत्यूविषयी कुटुंबियांनी काहीही शंका उपस्थित केली नसल्याने स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्या मृतदेहाचे पोस्टमार्टेम केले नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या