बुलेट ट्रेनविरोधात भिवंडीकर रस्त्यावर उतरले; ग्रामस्थ, विद्यार्थ्यांची पाच ते सहा किमीची फरफट

मुंबई-बडोदा बुलेट ट्रेनने भिवंडीकरांची नाकाबंदीच केली आहे. बुलेट ट्रेनच्या कारशेडचे काम करताना प्रशासनाने तालुक्यातील भरोडी गावाला जोडणारा मुख्य रस्ताच परस्पर खोदून ठेवला असून ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना तब्बल पाच ते सहा किलोमीटरची फरफट करावी लागत आहे. इतकेच नाहीतर शेतकऱ्यांनाही आपल्या शेतात जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊनही कानाडोळा केला जात असल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरत आंदोलन केले.

बुलेट ट्रेन व कारशेडमुळे भिवंडी तालुक्यातील मौजे भरोडी येथील अनेक शेतकरी बाधित होत आहेत. येथील ग्रामस्थांना विश्वासात न घेताच बुलेट ट्रेनचे अधिकारी मनमानीपणे काम करीत आहेत. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. भरोडी गावाला जोडणारा एकमेव मुख्य रस्तादेखील अशाच पद्धतीने खोदण्यात आला आहे. पावसाळ्यात याठिकाणी चिखलाचा प्रचंड राडारोडा होणार असून गावकऱ्यांचे चालणे मुश्कील होणार आहे. त्यातच रस्त्याच्या दुरवस्थेमुळे
पाच ते सहा किलोमीटरच्या अधिकचे अंतर चालावे लागणार आहे. वृद्ध, विद्यार्थी यांची सर्वाधिक फरफट होणार आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य देवेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन करण्यात आले. यावेळी सरपंच विलास पाटील, उपसरपंच संगीता पाटील, सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

भुयारी मार्ग बांधून द्या !
बुलेट ट्रेनचे अधिकारी प्रणव पाटील यांना ग्रामस्थांनी निवेदन दिले. रस्त्याचा प्रश्न कायमचा मिटावा यासाठी भुयारी मार्ग बांधून द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान २१ मार्च रोजी या सर्व समस्यांबाबत ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी भूसंपादन अधिकारी तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिले होते. मात्र तीन महिने व्हायला आले तरी प्रशासनाने याची दखल घेतली नाही, असा आरोप सरपंच विलास पाटील यांनी केला आहे.

सांडपाण्याने दुर्गंधी वाढणार
बुलेट ट्रेनचे काम मनमानी पद्धतीने केले जात आहे. या मार्गावर संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. मात्र हे काम करताना गावातून वाहणाऱ्या सांडपाण्याचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही. त्यामुळे भविष्यात पाण्याचा निचरा न होता हे सांडपाणी गावातील रस्त्यांवरच अस्ताव्यस्त वाहणार असल्याने प्रचंड दुर्गंधी पसरेल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.