
सामना प्रतिनिधी । भोकर
71 वर्षाची परंपरा असलेल्या श्रीगणेश मंदिरास तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा अशी जूनी मागणी होती. भाविकांच्या भावनिक मागणीची दखल घेत नवनिर्वाचित खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शासन दरबारी पाठपुरावा करत पालकमंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीत तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यात यश संपादन केल्याने भाविकातून आनंद व्यक्त होत आहे.
भोकर तालुक्यातील तेलंगणा सिमेवर असलेल्या पाळज येथे जाज्वल्य श्रीगणेशाचे मंदिर आहे. विशेष म्हणजे या मंदिरातील गणपतीची मूर्ती लाकडापासून बनवलेली आहे. केवळ गणेशोत्सवाच्या काळातच या मूर्तीचे भाविकांना दर्शन घडते. नवसाला पावणारा म्हणून सर्वदूर ख्याती असलेल्या गणपतीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह तेलंगणा आंध्रप्रदेश कर्नाटक येथून मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करतात. गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात भाविकांना अन्नदान व सोयी सुविधा मंडळाच्या वतीने पुरविल्या जातात. तालुक्यातील अतिमहत्वाचे असलेल्या या स्थानाचा विकास व्हावा करीता तिर्थ व पर्यटनक्षेत्राचा दर्जा मिळावा, अशी मागणी अनेक वर्षापासून होती. परंतू सदर रास्त मागणी दुर्लक्षितच राहिल्याने या भागाचा निधीअभावी म्हणावा तसा विकास झाला नाही. नवनिर्वाचित खासदार चिखलीकर यांनी प्रचार शुभारंभी दिलेल्या वचनाची पूर्तता करत मुख्यमंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे सातत्याने प्रश्न उपस्थित करुन नांदेड येथे पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पाळज येथील गणेश मंदिरास तिर्थ व पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यास यश संपादन केल्याची माहिती भाजपा तालुकाध्यक्ष गणपत पिटेवाड, जि.प.सदस्य दिवाकररेड्डी सुरकूंटवाड, यांनी दिली तिर्थ व पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळवून दिल्याबद्दल महाराष्ट्र शासनासह खासदार चिखलीकर यांचे राजा खंडेराय देशमुख, दिलीप सोनटक्के, प्रकाश मामा कोंडलवार, संतोष मारकवार, गणेश मंदिर संस्थेचे अध्यक्ष लिंगन्ना तोटावाड, सरपंच उपूवाड गंगाधर, उपसरपच लक्ष्मण पूप्पलवार आदींसह अनेक भाविकांनी अभिनंदन केले.






























































