15 वर्षांनी पुन्हा उघडला ‘त्या’ रहस्यमयी राजवाड्यातला दरवाजा! पाहा व्हिडीओ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘एक रहस्यमयी राजवाडा.. त्याचा रक्तरंजित भूतकाळ आणि एक दरवाजा.. जो 15 वर्षांपासून बंद होता. तो आता पुन्हा उघडला. त्या दरवाजामागे नेमकं काय रहस्य आहे, तेही लवकरच सर्वांना कळणार आहे’ हे वर्णन एखाद्या गूढरम्य कादंबरीतलं किंवा एखाद्या झपाटलेल्या जागेविषयी वाटतं. हो ना? पण इथे थोडी गोम आहे. कारण हे वर्णन एका आगामी चित्रपटाचं आहे. त्या चित्रपटाचं नाव अर्थातच भुलभुलैय्या-2.

15 वर्षांपूर्वी भुलभुलैय्या नावाचा विनोदाची झालर असलेला एक धमाल रहस्यपट प्रदर्शित झाला होता. एका राजवाड्यातल्या एक गूढ बंद दरवाजा, त्याचं रहस्य आणि त्याची उकल अशी त्याची कथा होती. अक्षय कुमार, शायनी आहुजा, विद्या बालन, अमिषा पटेल, परेश रावल यांच्या अभिनयाने नटलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्याचा सिक्वल आता येऊ घातला असून या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये आधीच्या भुलभुलैय्यासारखाच राजवाडा दिसत असून पाठीमागे आमी जे तुमार हे गाणं ऐकू येत आहे. एक भुतासारखी आकृतीही पडद्यावर झळकते आणि नंतर काळ्या कपड्यातला कार्तिक आर्यनही दिसतो. काही दिवसांत या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर कथेचा अंदाजही येईल.

कार्तिक आर्यनसोबत अभिनेत्री कियारा आडवाणी आणि तब्बूही या चित्रपटात झळकणार आहेत. अनिस बझमी या चित्रपटाचे दिग्दर्शक असून भूषण कुमार यांची निर्मिती असणार आहे. कियारा ही नायिकेच्या भूमिकेत असून तब्बू ही भुताच्या भूमिकेत दिसेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा चित्रपट 20 मे रोजी प्रदर्शित होत आहे.

पाहा टीझर –