नगरसह बीड जिल्ह्यात दरोडे घालणाऱया भोसले टोळीवर ‘मोक्का’ची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिल्ह्यात संघटित गुन्हे करणाऱ्या कुख्यात भोसले टोळीतील 5 सदस्यांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.

आजिनाथ विलास भोसले (वय 22), कृष्णा विलास भोसले (वय 22), भरत विलास भोसले, रावसाहेब विलास भोसले (वय 40, सर्व रा. हावतळण दाखले, ता. आष्टी, जि. बीड), सुरेश पुंजाराम काळे (वय 38, रा, सोनविहीर, ता. शेवगाव, जि. नगर), पवन युनूस काळे (रा. गुनवडी, ता. नगर), अशी आरोपींची नावे आहेत. यातील पवन काळे व भरत भोसले हे दोघे फरार असून, इतरांना अटक करण्यात आली आहे.

नगर जिल्ह्यातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पोलीस अधीक्षक मनोज पाटील विविध गुन्हेगारांची माहिती संकलित करून संघटितपणे गुन्हे करणाऱया टोळ्यांविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचे संकेत दिले होते. नगर तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत दरोडय़ाचा गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा अजिनाथ विलास भोसले व त्याच्या टोळीने संघटितपणे केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. या टोळीविरुद्ध मोक्का कायद्यान्वये कारवाईसाठी नगर तालुका पोलिसांकडून विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याला मंजुरी मिळाली आहे.

या टोळीविरुद्ध नगर जिल्ह्यातील कोतवाली, श्रीगोंदा, शेवगाव, नगर तालुका पोलीस स्टेशन तसेच बीड जिल्ह्यातील अंभोरा, आष्टी पोलीस स्टेशन हद्दीत गंभीर स्वरूपाच्या रिव्हॉल्व्हरसह पेट्रोल पंपावर दरोडा टाकणे, घरफोडी करणे, घरात घुसून ठार मारणे, जबरी चोरी करणे, दुखापत करून दरोडा टाकणे असे गुन्हे दाखल आहेत.