भोस्ते घाटातील रस्त्याचे किमान 6 महिने संपणार नाही, पुढच्या पावसाळ्यातही घाटातील वाट अवघडच

785

मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातून रस्ता तयार करण्याचे काम ठेकेदार कंपनीने हाती घेतले आहे. हे काम युद्धपातळीवर सुरु असल्याचा दावा केला जात आहे. असं असलं तरी भोस्ते घाट पोखरण्याचे काम हे काम पुढचे 6 महिने म्हणजे मे 2020 पर्यंत पूर्ण होण्याची कोणतीही शक्यता नाहीये. 3 पोकलेन आणि 2 जेसीबी मशिन्सच्या सहाय्याने  घाटातील रस्त्यासाठीचे फोडाफोडीचे काम सुरू आहे. घाट तोडण्याचे काम मे 2020 अखेरपर्यंत पूर्ण होणे शक्य नसल्याने यावर्षीही पावसाळ्यात भोस्ते  घाटाची वाट अवघडच ठरणार आहे.

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम दोन वर्षांपासून सुरु  आहे. कशेडी ते परशुराम घाट दरम्यानच्या ४४ किलोमीटरचे काम कल्याण टोलवेज इन्फ्रास्ट्रुक्चर या कंपनीकडे आहे. गेल्या दोन वर्षात कंपनीने सुमारे २२ किलोमीटरच्या  क्राँक्रिटीकरणचे  काम पूर्ण केल्याचा दावा केला आहे. महामार्ग चौपदरीकरण दरम्यान कशेडी ते परशुराम घाटा दरम्यानच्या काही ठिकाणांचे सपाटीकरण करणे ठेकेदार कंपनीसाठी अतिशय आव्हानात्मक ठरले आहे. या मार्गात येणारा 4 किलोमीटरचा भोस्ते घाट हा त्यातही अवघड टप्पा मानला जात आहे.

भोस्ते घाट हा तीव्र वळणे असल्याने अनेक भीषण अपघातांना कारणीभूत ठरला आहे. यामुळे या घाटातील अवघड वळणे काढून टाकण्याचे काम हाती घेणे आवश्यक होते. याशिवाय दरड कोसळून दुर्घटना होऊ नये म्हणून घाटातील कातळी दरडही काढावी लागणार होती. घाट पोखरण्याचे काम यावर्षी मुसळधार पावसातही सुरू  होते. चौपदरीकरणाचे काम करताना आवाशी, लोटे, या ठिकाणचे संपादित जागेवरील अतिक्रण हटवले गेले नव्हते. अतिक्रमणे काढण्यासंदर्भात संबंधितांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. मात्र संबंधित  दुकानदारांनी याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याने या परिसरात चौपदरीकरणाच्या कामामध्ये अडथळा निर्माण झाला होता.  संपादित जागेवरील बांधकामे न तोडली गेल्याने या परिसरात चौपदरीकरणाचे काम ठेकेदार कंपनीला सुरूच करता आले नव्हते . मात्र गेल्या महिन्यात पोलीस बंदोबस्तात या बांधकामांवर बुलडोझर फिरवण्यात आला आणि या परिसरात अडलेले चौपदरीकरणाचे काम सुरु झाले.

आपली प्रतिक्रिया द्या