भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेत अपहार प्रकरणात जळगावमधील भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार चंदुलाल पटेल हे देखील संशयीत आरोपी असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यांच्याविरूध्द एक महिन्यापूर्वीच अटक वॉरंट काढण्यात आले आहे.
पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बीएचआर अपहार प्रकरणात जळगाव शहर, जामनेर, भुसावळ, संभाजीनगर धुळे, मुंबई, अकोला आणि पुणे या जिल्ह्यात एकाचवेळी छापेमारी करत 12 जणांना अटक केली होती. त्यावेळीच पटेल यांच्याविरोधात अटक वारँट काढण्यात आले होते. यावेळी सराफ तथा हॉटेल व्यावसायिक भागवत भंगाळे, दालमिल असोसिएशनचे अध्यक्ष प्रेम नारायण कोगटा, संजय तोतला, जयश्री शैलेश मणियार (सर्व रा. जळगाव) जितेंद्र रमेश पाटील, कापूस व्यापारी राजेश लोढा (रा.जामनेर), जामनेर पंचायत समितीचे माजी सभापती व नगरसेवक छगन झाल्टे, भुसावळचे माजी उपनगराध्यक्ष आसिफ मुन्ना तेली (रा. भुसावळ), प्रितेश चंपालाल जैन ( रा.धुळे), अंबादास आबाजी मानकापे ( रा. संभाजीनगर), जयश्री अंतिम तोतला ( रा. मुंबई) व प्रमोद किसनराव कापसे (रा.अकोला) यांना अटक झाली होती. त्यातच आमदार चंदुलाल पटेल यांच्याविरोधात देखील अटक वारँट निघाले होते. याप्रकरणात बरेच दिवस फरार असलेल्या अवसायक जितेंद्र खंदारेला नुकतीत अटक करण्यात आली होती. याप्रकरणात आतापर्यंत 18 जणांना अटक झाली आहे. दरम्यान, बीएचआर घोटाळा प्रकरणी पुणे पोलिसांनी चंदुलाल पटेल यांच्या विरोधातही अटक वॉरंट काढले आहे. याप्रकरणात ते फरार असून शोध सुरू असल्याची माहिती आर्थिक गुन्हे व सायबर पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी दिली आहे.






























































