पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भूतानमध्ये अभूतपूर्व स्वागत

645

हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतानमध्ये दाखल झाल्यावर तिथे पंतप्रधानांचे अभूतपूर्व असं स्वागत झालं. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी हजारो मुले आणि महिला हातात हिंदुस्थानी तिरंगा ध्वज आणि भूतानचा झेंडा घेऊन रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. हे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारेच होते.भूतानी लष्कराने मोदी यांच्या सन्मानार्थ पारो विमानतळावर त्यांना ‘गार्ड ऑफ हॉनर”ही दिला.

शेजारी राष्ट्र भूतानसोबतचं मैत्रीचं नातं अधिक घट्ट करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांचा दोन दिवसीय भूतान दौरा आजपासून सुरू झाला. मोदींचा हा दुसरा भूतान दौरा आहे तर पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या टर्ममध्ये ते प्रथमच भूतानमध्ये गेले आहेत. पारो आंतरराष्ट्रीय विमानतळावर भूतानचे पंतप्रधान लोटे शेरिंग यांनी पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं. त्यानंतर पंतप्रधानांना ‘गार्ड ऑफ हॉनर’ देण्यात आला. तिथून पुढे पंतप्रधानांच्या गाड्यांचा ताफा जात असताना स्वागतासाठी हजारो नागरिक रंगबिरंगी वेशात पंतप्रधानांच्या स्वागतासाठी हाती तिरंगा घेऊन उभे होते. एखाद्या रंगारंग उत्सवासारखेच हे वातावरण होतं. याचा खास व्हिडिओ परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

राजे जिग्मे खेसर वांगचुक यांच्याशीही चर्चा करणार

भूतान हा हिंदुस्थानचा अत्यंत निकटचा विश्वासू शेजारी असून माझ्या भेटीने उभय देशातील मैत्री अधिकच घट्ट होईल असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.ते दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यात भूतानचे राजे जिग्मे खेसर नामगेल वांगचुक यांच्याशीही उभय देशातील संबंधांबाबत चर्चा करणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी आणि भूतानी नेत्यांतील भेटीत 10 नवे द्विपक्षीय करार होतील असे वृत्त आहे.

आपली प्रतिक्रिया द्या