वनडे मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का, आणखी एक खेळाडू दुखापतग्रस्त

विंडीजविरुद्ध टी-20 मालिकेत विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाचा संघ एक दिवसीय मालिकेची तयारी करत आहे. 15 डिसेंबरपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. चेन्नईत होणाऱ्या या पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाचा संघ पोहोचला आहे. परंतु तत्पूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला असून बडा खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे.

टीम इंडिया आणि वेस्ट इंडीजमध्ये होणाऱ्या तीन सामन्यांच्या मालिकेआधी टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार जायबंदी झाला आहे. भुवी या मालिकेत खेळणार अथवा नाही याबाबत अद्याप घोषणा करण्यात आली नाही. भुवीच्या जागी वेगवान गोलंदाज नवदीप सैनी याला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

टीम इंडियाला हा दुसरा धक्का आहे. याआधी सलामीवीर फलंदाज शिखर धवन सय्यस मुश्ताक अली स्पर्धेदरम्यान दुखापग्रस्त झाला होता. त्यामुळे तो विंडीजविरुद्ध टी-20 मालिकेला मुकला होता. तसेच आगामी एक दिवसीय मालिकेतूनही त्याने माघार घेतली. त्याच्या जागी कसोटीमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या मयांक अग्रवालची निवड करण्यात आली.

भुवीला दुखापतीचे ग्रहण
वर्ल्डकपनंतर ऑगस्ट महिन्यात भुवनेश्वरला दुखापत झाली होती. त्यानंतर मोठ्या कालावधीसाठी तो संघाबाहेर होता. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत तो मैदानात उतरला होता. आता तो पुन्हा दुखापतग्रस्त झाल्याने टीम इंडियाच्या वेगाची धार कमी झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या