
घरफोडी करून माघारी जाण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांनी स्थानिक रहिवाशांवर हल्ला केल्याची घटना रविवारी पहाटे तीनच्या सुमारास पुण्याच्या बिबवेवाडीतील सुखसागरनगरमध्ये घडली आहे.
याप्रकरणी सचिन बापुराव कसबे (वय.33, रा. दिगंबर प्रसाद सोसायटी सुखसागरनगर) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघा चोरट्यांच्या विरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण चव्हाण असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कसबे त्यांच्या आईला भेटण्यासाठी राहते घर बंद करून दौंडला गेले होते. रविवारी पहाटे तीनच्या सुमारास दोन चोरट्यांनी त्यांच्या घराच्या खिडकीचे ग्रील उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी कपाटातून एक लाखाची रोकड, घड्याळ, सोन्याचे दागिने असा 3 लाख 47 हजारांचा किंमती ऐवज चोरी केला.
दरम्यान दोघे चोरटे चोरी करत असताना कसबे यांच्या समोर राहणारे संकेत चव्हाण व प्रवीण काशीनाथ चव्हाण यांनी पाहिले. त्यांनी प्रसंगावधान राखत चोरट्यांना दोघांनी पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चोरट्यापैकी एकाने प्रविण चव्हाण यांना हाताने मारहाण करून ढकलून दिले. त्यामुळे प्रविण जखमी झाले आहेत.
त्यानंतर चोरट्यांनी तेथून पळ काढला. बिबवेवाडीचे पोलिस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला.




























































