अमिताभ बच्चन यांना फाळके पुरस्कार

641

बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांना हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने मंगळवारी ही माहिती दिली. दहा लाख रुपये आणि सुवर्ण कमळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. बिग बी यांना हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर होताच त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अमिताभ बच्चन यांचे नाव सर्वसंमतीने निवडण्यात आल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल केंद्र सरकारतर्फे दादासाहेब फाळके पुरस्कार दिला जातो. यंदाचा हा 66 वा पुरस्कार आहे. 2018 साली अभिनेते विनोद खन्ना यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पुरस्काराची सुरुवात दादासाहेब फाळके यांच्या जन्मशताब्दी वर्षात 1969 साली झाली.

एका युगाचा महानायक

अमिताभ बच्चन हे हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक समजले जातात. आपल्या दमदार अभिनयाच्या आणि भारदस्त आवाजाच्या बळावर त्यांनी टीकाकारांचे तोंड बंद करीत यशाचे सर्वोच्च स्थान गाठले. गेल्या पाच दशकांत ते बॉलीवूडवर अधिराज्य गाजवत आहेत. 70च्या दशकात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेले बच्चन आजही त्याच स्थानावर आहेत. हिंदी सिनेसृष्टीत फार थोडय़ा कलाकारांना हे भाग्य लाभले आहे. बच्चन यांच्याशिवाय हिंदी चित्रपटसृष्टीचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही.
अमिताभ बच्चन यांनी 1969 साली ‘सात हिंदुस्थानी’ या चित्रपटातून बॉलीकूडमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी 180 हून अधिक सिनेमांत काम केले आहे. ‘जंजीर’, ‘दीवार’, ‘शोले’ अशा चित्रपटांतील त्यांच्या अँग्री यंग मॅन प्रतिमेने सिनेरसिकांना वेड लावले. अनेक पुरस्कारांवर त्यांनी आपले नाव कोरले. यामध्ये चार राष्ट्रीय तर 14 फिल्मफेअर पुरस्कारांचा समावेश आहे. अभिनयाव्यतिरिक्त पार्श्वगायक, निर्माता, सूत्रसंचालक आणि खासदार अशा भूमिकाही वास्तव जीवनात त्यांनी साकारल्या आहेत. त्यांच्या टेलिव्हीजनवरील ‘कौन बनेगा करोडपती’ या शोने लोकप्रियतेचे उच्चांक गाठले आहेत. 76 क्या वर्षीय अमिताभ यांच्याकडे अनेक चित्रपट येत आहेत. ‘झुंड’, ‘साय रा नरसिम्हा रेड्डी’, ‘तेरा यार हूं मैं’, ‘बटरफ्लाय’, ‘एबी यानी सीडी’, ‘ब्रह्मास्त्र’, ‘चेहरे और गुलाबो सिताबो’ या चित्रपटात अमिताभ प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. त्यांनी पोलिओ निर्मूलनच्या यशस्वी अभियान देशभरात राबवले. या कामासाठी 2005 साली बच्चन यांना युनिसेफने सद्भावना राजदूत म्हणून नियुक्त केले होते.

अमिताभ यांनी गेल्या दोन पिढय़ांपासून बॉलीवूडमध्ये काम केले आहे. त्यांच्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. अमिताभ यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याने संपूर्ण देश तसेच परदेशातील लोकांना आनंद झाला आहे. ‘माझ्याकडून अमिताभ यांना मनःपूर्वक शुभेच्छा’ असे ट्विट जावडेकर यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या