
‘बिग मी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीमध्ये राज्यातील सुमारे दीड हजार लोकांनी थेट, तर कुकाणा पतसंस्थेच्या माध्यमातून कंपनीअंतर्गत केलेल्या डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून गुंतवणूक केलेले लाखो गुंतवणूकदार आहेत. त्यामुळे फसवणुकीची ही रक्कम 100 कोटींवर आहे. त्यामुळे या फसवणुकीची ‘एसआयटी’द्वारे चौकशी करण्याची मागणी ठेवीदारांनी पत्रकार परिषदेत केली.
आरोपी सोमनाथ राऊत, त्याची पत्नी सोनिया राऊत व त्याच्या मेहुण्याने ही फसवणूक केली असून, त्यांच्या या कंपनीने अनेक गुंतवणूकदारांना गंडा घातला आहे. याबाबत येथील तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्यापि तपास अधिकारी नेमलेला नाही, आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास दिल्याचे सांगितले जात असले, तरी याबाबतच्या आदेशावर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी शेरा मारलेला नाही, असे आर्थिक गुन्हे शाखेतून सांगितले जात आहे. त्यामुळे वेळेत तपास झाला नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा संबंधित गुंतवणूकदारांनी आज नगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. यावेळी सतीश खोडवे, धर्मा झालटे, श्रीधर चव्हाण, अशोक विघ्ने, सुधीर पठारे, रोहिणी दिवटे, नागेश लवटे आदी उपस्थित होते.
‘बिग मी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीचे मालक सोमनाथ राऊत, सोनिया राऊत व अन्य सातजणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्या वेळेला 12 जणांनी एकत्र फिर्याद दिली होती. या घटनेला एक महिना उलटून गेला, तरीही पोलीस तपास करायला तयार नाहीत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. तसेच संबंधित व्यक्तींचा शोध घ्यावा, या कंपनीबरोबर करार केलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या अधिकाऱयांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. गुंतवणूकदारांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचीही भेट घेऊन या आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची मागणी केली.
सोमनाथ राऊत याने विश्वास संपादन करून सर्वसामान्य गुंतवणूकदारांना कोटय़वधींचा गंडा घातला आहे. राज्यभरात असे 1500च्या वर गुंतवणूकदार असून, फसवणुकीची रक्कम 100 कोटींच्या घरात आहे. दोन हजार पतसंस्थाही यात अडकल्या आहेत. या कंपनीमध्ये काम करणाऱया वंदना पालवे या मुख्य कार्यकारी अधिकारी असून, आर्थिक व्यवहारासाठी त्यांचा ड्रायव्हर सोनकांबळे, ऑफिसबॉय प्रवीण खेडकर यांच्या नावांची बँक खाती वापरण्यात आली आहेत. नाशिक येथील जाधव नावाच्या एका गुंतवणूकदाराचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. यासंदर्भात वेगळा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या प्रकरणाची चौकशी ‘एसआयटी’मार्फत करण्याची मागणी आम्ही राज्य आणि केंद्र सरकारकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
























































