
सध्याच्या घडीला राज्यामध्ये २९ महापालिकांची रणधुमाळी सुरु आहे. याच काळात आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचेही पडघम वाजणार आहेत. या आठवड्यामध्ये दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होणार आहे. असे संकेत राज्य निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडून अधिकृत घोषणा बुधवार (७ जानेवारी) होण्याची शक्यता आहे. मात्र, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुप्रीम कोर्टाने दिलेली डेडलाइन ओलांडली जाईल असे संकेत दिसू लागले आहेत. या निवडणुकांसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान होईल असे वर्तवण्यात येत आहे.
राज्यामध्ये ३२ जिल्हा परिषदा व ३३६ पंचायत समित्या आहेत. यापैकी १७ परिषदा आणि ८८ समित्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आलेली आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मर्यादेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येणार आहे. यासंदर्भातील नियोजन राज्य निवडणूक आयोगाकडून सुरू करण्यात आले आहे.
सध्याच्या घडीला २९ जिल्ह्यांतील संपूर्ण यंत्रणा ही महापालिका निवडणुकांमध्ये व्यस्त आहे. त्यासोबत काही महापालिकांमध्ये निर्माण होणारी संवेदनशील तसेच तणावाची परिस्थिती पाहता अतिरिक्त अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या कारणास्तव जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक महापालिका निवडणुकीनंतर घेण्यात येईल, असे निवडणूक आयोगातील सूत्राने स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुका ३१ जानेवारीआधी घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता लवकरच या निवडणुकांची घोषणा होणार असल्याचे समजते.


































































