
कोटय़वधी रुपयांचा खर्च करूनही प्रेक्षकांनी कलर्सवरील बिग बॉस-15 या शोकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे वेळेआधी म्हणजे फेब्रुवारीपूर्वीच हा शो बंद करण्याच्या विचारात निर्माते असल्याची चर्चा आहे.
गेल्यावर्षी आलेल्या बिग बॉसच्या-14 व्या सीजनने आजवरच्या सर्व सीजनचे टीआरपीचे रेकॉर्ड ब्रेक केले होते. मात्र बिग बॉसच्या 15व्या सीजनला सुरुवातीपासूनच फारशी कमाल दाखवता आली नाही. बिग बॉसच्या घरात शमिता शेट्टी, करण पुंद्रा, तेजस्वी प्रकाशसारख्या बडय़ा नावांचा समावेश तसेच राकेश बापट, नेहा भसीन यांच्या वाइल्ड कार्ड एंट्रीची जादूदेखील प्रेक्षकांवर फारशी चालली नाही. गेल्या अनेक सीजनपासून सलमान खान बिग बॉसचे सूत्रसंचालन करतोय. सलमानच्या लोकप्रियतेचा या शोच्या टीआरपीला नेहमीच फायदा होतो. त्यामुळे निर्मात्यांनी सलमानला या सीजनसाठी तब्बल 500 कोटी रुपये एवढे मानधन दिले होते. तसेच बिग बॉसचे घर यंदा जंगल थीमवर आधारित असल्याने त्यासाठीही निर्मात्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. तरीही प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात बिग बॉस 15 सपशेल अयशस्वी ठरल्याचे दिसत आहे.






























































