
सामना ऑनलाईन । पटणा
मला राजकारणातून संपविण्याचा कट काही लोक आखत आहेत. पण त्यांचे हे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, असे टीकास्त्र बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजद नेते तेजस्वी यादव यांच्यावर सोडले.
गेल्या आठवडय़ात झालेल्या पोटनिवडणुकीत जोकीहाथ विधानसभा मतदारसंघात राजदने विजय मिळवीत जदयूची जागा खेचून घेतली. त्यानंतर सातत्याने लालूप्रसाद यादव यांचे पुत्र, राजद नेते तेजस्वी यादव यांच्याकडून नितीश कुमार यांच्यावर टीका सुरू आहे. जदयूच्या युवा आघाडीच्या कार्यक्रमात बोलताना नितीश कुमार यांनी नाव न घेता तेजस्वी यादवांवर टीका केली. आमच्या काही विरोधकांना काहीच करता येत नाही. त्यामुळे रोज कोणत्याही मुद्दय़ावर ४-५ ट्विट करीत असतात. परिवारच्या जोरावर असे लोक राजकारण करीत आहेत. पैसे कमवण्यासाठी हे लोक राजकारणात आहेत, असे नितीश कुमार म्हणाले.
बिहारात ‘एनडीए’चा चेहरा कोण? नितीश कुमार म्हणाले, योग्य वेळी उत्तर देईन
बिहारात जदयू-भाजप आघाडीचे सरकार असले तरी सर्वकाही अलबेल नाही. दोन्ही पक्षांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये नितीश कुमार हेच चेहरा असतील. आम्हीच मोठे भाऊ असल्याचे जदयू नेत्यांनी जाहीरपणे म्हटले आहे. याविषयी काल इफ्तार पार्टी वेळी नितीश कुमार यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी योग्य वेळी उत्तर देईन, असे सांगितले.


























































