Bihar Election – बिहारला भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीमुक्त राज्य व्हायचंय, तेजस्वी यादव यांनी राघोपूरमधून उमेदवारी अर्ज केला दाखल

राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव यांनी बिहारमधील राघोपूरमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना तेजस्वी यादव म्हणाले, “राघोपूरच्या लोकांनी सलग दोनदा आमच्यावर विश्वास ठेवला आहे. जनताच मालक आहे. राघोपूरमधून आम्ही तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आम्हाला खात्री आहे की, राघोपूरचे लोक पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास ठेवतील. आम्हाला फक्त सरकार स्थापन करायचे नाही, तर आम्हाला बिहारचे नवनिर्माण करायचं आहे.”

तेजस्वी यादव पुढे म्हणाले की, “बिहार आता भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीमुक्त राज्य बनू इच्छित आहे. अनेक लोक अफवा पसरवत होते की, मी दोन जागांवरून निवडणूक लढवणार. तेजस्वी २४३ जागांवरून निवडणूक लढवत आहेत, पण जेव्हा एका जागेचा विचार केला जातो तेव्हा आम्ही आधीच राघोपूरमधून निवडणूक लढवली आहे आणि मी फक्त राघोपूरमधूनच निवडणूक लढत आहे .”