मुख्यमंत्री पदासाठी तेजस्वी आघाडीचा चेहरा, बिहारच्या उपमुख्यमंत्री पदासाठी व्हीआयपीचे साहनी यांचे नाव

बिहार विधानसभा निवडणूक राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वात महाआघाडी करून लढण्याचा निर्णय कॉँग्रेससह विरोधी पक्षांनी घेतला आहे. राजदचे तेजस्वी यादव हे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील. तर व्हीआयपीचे मुकेश साहनी उपमुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील, अशी घोषणा कॉँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी महाआघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत केली.

कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी पाटणा येथे राजद नेते लालूप्रसाद यादव व तेजस्वी यादव यांची भेट घेऊन चर्चा केली आणि महाआघाडीत निर्माण झालेला तिढा सोडवला. महाआघाडीतील सर्वांची मते विचारात घेतल्यानंतर या विधानसभा निवडणुकीसाठी तेजस्वी यादव हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील, तर मुकेश साहनी उपमुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील. अन्य उपमुख्यमंत्री मागासवर्गीय समाजातील असेल, असे गेहलोत यांनी जाहीर केले. तेजस्वी यादव आमचे नेते आहेत. एनडीएने त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल हे जाहीर करावे. आम्ही नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवू असे म्हणणे पुरेसे नाही, असे गेहलोत म्हणाले.

तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला आहे. मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. मी सर्वांना सांगू इच्छितो की, त्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाचे मी पालन करेन. मी 20 वर्षांचे अकार्यक्षम सरकार उलथवून टाकेन. – तेजस्वी यादव, राजद नेते

महागठबंधनमधील पक्ष

राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये काही विरोधी पक्षांनी एकत्र येत महाआघाडी तयार केली आहे. यामध्ये काँग्रेससह विकासशील इन्सान पार्टी (व्हीआयपी), दीपांकर भट्टाचार्य यांच्या नेतृत्वाखालील भाकप (सीपीआय-एमएल), भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीएम-मार्क्सवादी), भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय) या पक्षांचा समावेश आहे.